You are currently viewing साळीस्ते, शिडवणे, तळेरेत घरफोड्या

साळीस्ते, शिडवणे, तळेरेत घरफोड्या

साडेपाच लाखाचा ऐवज चोरी

कणकवली

साळीस्ते-ताम्हणकरवाडी येथील विलासीनी विलास पावसकर यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाची कडी अज्ञात चोरट्याने तोडून आतील दागिने व रोख रक्कमेसह 1 लाख 65 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला तर शिडवणे येथील विजय महादेव टक्के यांचे घर फोडून चोरट्यांनी 3 लाख 77 हजार रू. किंमतीचे दागिने व रोख रक्कम तसेच तळेरे-औदुंबरनगर येथील सुधीर शशिकांत आरोलकर यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी 2500 रू. रोख रक्कम असा तीन्ही घरातील मिळून 5 लाख 44 हजार 500 रू. किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. तर या तीन्ही गावातील अन्य काही घरे चोरट्यांनी फोडली असून तेथे चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. ही घटना रविवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 9 या मुदतीत घडली.

तळेरे परिसरात झालेल्या या धाडसी घरफोड्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांनी बंद घरे लक्ष्य केली आहेत. सोमवारी सकाळी 9 वा. च्या सुमारास नरहरी रघुनाथ पावसकर (रा. तळेरे, मूळ रा. साळीस्ते-कांजीरवाडी) हे त्यांच्या मूळ घराकडे साळीस्ते येथे जात असताना त्यांची वहिनी विलासीनी पावसकर यांच्या घरासमोरील लोखंडी गेटचे कुलूप तोडून टाकलेले व गेट उघडा दिसला, म्हणून त्यांनी घरात जावून पाहिले असता मुख्य दरवाजाची कडी तुटलेली होती, कुलुप काढलेले व दरवाजा अर्धवट स्थितीत दिसला. त्यांनी दरवाजातून पाहिले असता घरातील लोखंडी कपाटातील साहित्य विस्कटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी वहिनी विलासीनी यांना फोन करून माहिती दिली. कपाटातील 60 हजार रोख रक्कम, 80 हजार रू.ची 22 ग्रॅमची सोन्याची चेन, 20 हजार रू. किंमतीचा 7.5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या असा एकूण 1 लाख 65 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.

तर याच रात्री चोरट्यांनी साळीस्ते येथील सहदेव सावळाराम गुरव, प्रभावती वासुदेव गुरव, शिडवणे येथील वसंत कोथंबीरे, प्रकाश शंकर मिसाळ, विजय महादेव टक्के आणि तळेरे औदुंबरनगर येथील सुधीर शशिकांत आरोलकर यांच्या बंद घरांच्या दरवाजांची कडी तोडून आत प्रवेश करत चोरी केल्याचे समजले आहे. त्यापैकी शिडवणे-कोणेवाडी येथील विजय महादेव टक्के यांच्या घरातील 80 हजार रू. रोख रक्कम, 88 हजार रू. किंमतीचे 25 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 20 हजार रू. किंमतीचा 6 ग्रॅमचा कानातील लेडीज चेनची जोड, 14 हजार रू. किंमतीचा मोत्याचा हार, 20 हजार रू. किंमतीचा 5 ग्रॅम वजनाचा गणपतीचे चित्र मुद्रीत पेन्डल, 15 हजार रू. किंमतीची 5 ग्रॅमची सोन्याची चेन, 45 हजार रू. किंमतीचे दोन चांदीचे तांबे, 50 हजार रू. किंमतीचे मनगटी घड्याळ, 15 हजार रू. किंमतीचे मनगटी घड्याळ, 15 हजार रू. किंमतीचा चांदीचा लामन दिवा, 15 हजार रू. किंमतीची चांदीची पेटी असा सुमारे 3 लाख 77 हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. तर तळेरे औदुंबरनगर येथील सुधीर आरोलकर यांच्या घरातील 2500 रू.ची रोख रक्कम चोरीस गेली.

तळेरे परिसरातील चोरीच्या घटना समजताच सोमवारी सकाळी कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा