You are currently viewing मडुरा-डिगवाडी येथे गतिरोधकावर दुचाकी आदळून महिला जखमी

मडुरा-डिगवाडी येथे गतिरोधकावर दुचाकी आदळून महिला जखमी

बांदा

बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा-डिगवाडी येथे असलेल्या गतिरोधकावर दुचाकी आदळून पाठीमागे बसलेल्या रोहिणी गावडे (वय ६५, रा. वेंगुर्ले-अणसूर) जखमी झाल्या. सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर व स्थानिकांनी तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे पाठविले.
मडुरा न्यू इंग्लिश स्कूल समोर रस्त्यावर असलेले गतिरोधक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक बनत चालले आहेत. सदर ठिकाणी सूचना फलक, दिशादर्शक फलक तसेच सफेद पट्ट्या नसल्यामुळे गतिरोधक नवख्या वाहनचालकास दृष्टीस पडत नाही. आज वेंगुर्ले अणसूर येथील रोहिणी गावडे व त्यांच्या मुलाचा अपघात झाला. येथून जाणारे सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर व स्थानिकांनी तात्काळ जखमी माय-लेकाना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे पाठविण्यात आले.
दरम्यान, गौरेश पटेकर म्हणाले की नवख्या वाहनचालकाला गतिरोधक नजरेस पडत नाही. सदर अपघात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे झाला आहे. जर गतिरोधकाची देखभाल करण्यास अधिकारी किंवा बांधकाम विभाग सक्षम नसेल तर तात्काळ गतिरोधक हटवावा. कारण शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना येथूनच प्रवास करावा लागतो. त्यामुळे एकतर गतिरोधक हटवा किंवा सफेद पट्टे, सूचना फलक, दिशादर्शक फलक लावा. बांधकाम विभागाने याकडे तात्काळ लक्ष देऊन गतिरोधक निर्धोक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा