गाव संपर्क अभियान राबविण्याच्या सूचना
मालवण
येत्या काळात होऊ घातलेल्या येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह पूर्ण बहुमत मिळविण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. आपल्याकडे मजबूत पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे चांगले जाळे आहे. शिवाय जनतेचा आशीर्वादही आहे. त्यामुळे जनतेत जात त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवा असे आवाहन ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी येथे केले.
ग्रामीण भागाचा विकास साधायचा असेल तर जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सत्ता मिळविण्यासाठी गावागावात ‘गाव संपर्क अभियान’ सुरू करण्याच्या सूचना खासदार राऊत यांनी यावेळी दिल्या.
शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आज लिलांजली सभागृहात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, नितीन वाळके, मंदार केणी, जान्हवी सावंत आदी उपस्थित होते. खासदार राऊत म्हणाले, संघटना वाढीसाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. आमदार, खासदार यांच्यावर अवलंबुन न रहाता जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महिन्यातून दोनवेळा प्रत्येक गावात जाऊन संपर्क वाढवावा. आगामी वर्ष देशासह राज्यासाठी परिवर्तनाचे वर्ष आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाने सावध राहा. आपल्यासाठी पालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक देखील महत्वाची आहे. सिंधुदुर्गात आपल्याकडे जिल्हा परिषद नसल्याने निधी देण्यात आम्ही कमी पडतो. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत अपेक्षित यश येत नाही. आज शिंदे, भाजपा सरकारच्या काळात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दारू २०, २५ रुपयांना मिळते. पण रॉकेलचा भाव १०० रुपये होऊनही ते पण मिळत नाही. कोकणात ५० टक्के गावात पिण्याचे पाणी नाही. रेशनवर जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत. हे विषय जनतेपर्यंत न्या. त्यासाठी गावागावातील शिवसैनिक कार्यक्षम करणे आवश्यक आहे.
बूथ कमिट्या सक्षम करणे आणि जिवंत ठेवणे आवश्यक आहे. यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा आदर्श घ्या. त्यांचे बाहेरच्या राज्यातील केंद्रीय मंत्री आज बूथ कमिट्या जिवंत ठेवण्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात येत आहेत. एवढे मोठे नेते पक्ष संघटना सांभाळण्यासाठी येतात. यावरून संघटना बांधणीसाठी तो पक्ष किती सतर्क आहे, याचा विचार करा असे राऊत यांनी सांगितले.
ते म्हणाले, आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत संपूर्ण देश उभा आहे. अनेक आमदार, खासदार पक्षातून गेले असले तरी सामान्य मतदार उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे मेरिटवर विधानसभा जिंकू शकत नाही, हे भाजपाला कळून चुकले आहे. म्हणून संपूर्ण राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचे षडयंत्र आखले गेले आहे. यासाठी एम आय एम च्या लोकांना हाताशी धरून लव्ह जिहाद, औरंगाजेबचे भूत भाजपा आणू पाहत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात एकही जातीय दंगली होऊ शकल्या नाहीत. कोल्हापूर, संगमनेर, संभाजीनगर येथील दंगली भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी करून जाती जातीत तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजण्याचे प्रकार राज्यात भाजपा कडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार वैभव नाईक यांनी भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टिका केली. शिवसेनेतील फुटीला एक वर्ष पूर्ण झाले. अनेक आमदार, खासदार गेले. पण सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. सर्वसामान्य लोकांची नाळ शिवसेनेबरोबर जोडली आहे. शहरात अनेकांना फोडण्याचा प्रयत्न झाला. पण सत्ता जाऊन देखील अनेक जण शिवसेने सोबत आहेत. आपल्या विरोधात उदय सामंत, नारायण राणे, दीपक केसरकर यांच्यासारखे मंत्री आहेत. त्यामुळे गाफिल राहू नका. कुडाळमध्ये दोन दिवसांपूर्वी शासकीय कार्यक्रम घेतला. चार- चार हजार रुपये गाडीला देऊनही या कार्यक्रमाला लोक जमले नाहीत. आज मालवण मध्ये मागील नऊ वर्षात आपण अनेक कामे केली आहेत. विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी आचरा, विरण, कुडाळ तीन ठिकाणहून लाईट पुरवठा केला आहे. शहरात कामाच्या बाबतीत आपण कमी पडलो नाहीत. आपल्याकडे तीन तीन, चार चार वेळा निवडून आलेले नगरसेवक आहेत. मात्र कागदावर पदाधिकारी नको. ऍक्टिव्ह असणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे. युवा सेनेत नविन मंडळी आली आहेत. त्यांना योग्य संधी मिळाली पाहिजे. निवडणुका कधीही लागू शकतात. त्यामुळे गाफिल राहू नका. ताकदीने पालिका जिंकण्यासाठी काम करूया. मोदी सरकारचे अपयश जनतेसमोर मांडूया.
यावेळी अरुण दुधवडकर, नितीन वाळके, जान्हवी सावंत यांनी आपले विचार मांडले.