शरद पवार यांचे आत्मचरित्र पुस्तक भेट पाठविणार:- अर्चना घारे परब
सावंतवाडी
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात आज येथील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांना श्री. पवार यांनी लिहिलेल्या “लोक माझे सांगाती” या पुस्तकाची प्रत कुरिअर करण्यात आली. येथील पोस्ट कार्यालयात जाऊन त्यांनी हे पुस्तक राणेंना कुरियर केले.
यावेळी राणे यांनी केलेले विधान हे चुकीचे आहे. शरद पवार यांना अवघ्या देशात मान दिला जातो. परंतु राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान दुखावला गेला आहे. त्यामुळे आयुष्याच्या मार्गाने आम्ही हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, असे कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे यांनी सांगितले.
यावेळी महिला जिल्हाध्यक्ष रेवती राणे, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार दर्शना बाबर देसाई, महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान, तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी, शहर चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू, तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस, मारीता फर्नांडिस, पूजा दळवी आदी उपस्थित होते.