*भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर अभिजित सोनावणे लिखित अप्रतिम लेख*
*आम्ही कष्टकरी…. आम्ही गावकरी… !!!*
@doctorforbeggars
एखादी व्यक्ती भीक मागताना दिसली की तिला भिकारी असं सामान्यतः म्हटलं जातं… !
“भिकारी” हा शब्द मी वापरत नाही, *”भिक्षेकरी”* हा त्यातला त्यात सौम्य शब्द मी वापरतो आणि इतरांनी सुद्धा तोच शब्द वापरावा अशी अपेक्षा करतो.
एका “माणसाला” दुसऱ्या “माणसापुढे” दीनवानेपणाने मदत मागावी लागते, हात पसरावे लागतात, हि अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे आणि याच दुर्दैवी गोष्टीला पाहून एखाद्यावर *”भिकारी”* म्हणून शिक्का मारणे योग्य नाही.
भूतकाळ आठवून पहा …. आपल्यावर सुद्धा आयुष्यात केव्हातरी…. एकदा का होईना…. परंतु, अशी कोणापुढे… कोणत्यातरी कारणासाठी… हात पसरण्याची वेळ नक्कीच आलेली असेल… !
मग यांनाच “भिकारी” का म्हणायचं… ???
आपणही अनेक ठिकाणी याचना करतोच की….!
अशा नाडलेल्या लोकांना आपण *”दीनजन”* किमान भिक्षेकरी म्हणूया…. !
अर्थात, लोकांच्या मदत करण्याच्या वृत्तीचा गैरफायदा उठवणारे …भिकेचा धंदा करणारे …अनेक जण सुद्धा यात आहेत… थोडा वेळ आपण त्यांना वजा करूया….!
ज्यांना भिक मागायची लाज वाटते…. परंतु स्वतः जगण्यासाठी किंवा कोणालातरी जगवण्यासाठी नाईलाजाने भीक मागावी लागते, अशा “दीनजनांचा” आपण आज विचार करू.
या “दीनजनांना”, भिकारी असंच म्हटलं जातं…. यांना कोणत्याही सोयी सुविधा मिळत नाहीत…. कारण ते गावकरी नाहीत, कोणतीही कागदपत्रे नसल्यामुळे ते भारताचे नागरिकही नाहीत.
आजचा हा “भिक्षेकरी”….”गावकरी” कधी होईल ? याचा विचार करताना, काही वर्षांपूर्वी जाणवलं, की हे लोक जेव्हा भीक मागणं सोडून, काहीतरी कामधंदा करायला लागतील, तेव्हा सन्मानाने मिळालेला पैसा येईल…
आयुष्यात एक प्रकारचे स्थैर्य येईल आणि पुढच्या पिढीला शिक्षण किंवा इतर बाबी ते उपलब्ध करून देवु शकतील.
आणि म्हणून, 2018 साली आम्ही ठरवलं…
या लोकांना नुसतीच गोळ्या औषधं देण्याऐवजी त्यांच्या अंगात कोणत्या कला आहेत, ते शोधून त्या कलागुणांना वाव मिळेल, (उदा. बूट पॉलिश करता येते, दाढी कटिंग करता येते, वाती वळता येतात, एखादी गोष्ट विक्रीसाठी मिळाली तर ती विक्री करायला जमेल (Marketting), शिलाई काम येते इ. इ. ) अशा प्रकारचे व्यवसाय आपण त्यांना टाकून द्यायचे…. जेणेकरून कोणतीही नवीन गोष्ट न शिकवता, जे त्यांना येतंय… तेच त्यांना करण्यास देऊन त्यातून त्यांना पैसा मिळेल… !
आणि यातूनच आमचाही प्रवास सुरू झाला, आम्हालाही एक दिशा मिळाली…
मग कामाची टॅग लाईन ठरली *”भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी….!!!”*
ठरलं…. ज्याला जे येतंय, त्याचाच व्यवसाय त्याला टाकून द्यायचा…!
त्या व्यक्तीला काय येतंय ? भीक मागणं सोडून काम करायची इच्छा आहे का ? भिक्षेकरी नाही तर गावकरी व्हायची इच्छा आहे का ? हे शोधण्यासाठी…. मिळेल त्या मार्गाने त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचायचं… त्याचा विश्वास संपादन करायचा… भीक मागणं सोडून काम करायला त्यांना प्रवृत्त करायचं…. त्यासाठी जे काही करता येईल ते सर्व करायचं…. हे ठरवलं आणि तसं करत गेलो.
आज 7 जून 2023 पर्यंत 175 कुटुंबांना, भिकेच्या डोहातून बाहेर काढलं आहे. ज्यात त्यांना आवड आहे, जे त्यांना जमतंय, असे व्यवसाय त्यांना टाकून दिले आहेत.
2018 पासून सुरू झालेली ही गाडी, या पाच वर्षात 175 आकड्या पर्यंत पोचली आहे…
175 कुटुंबं आजच्या तारखेला भिक्षेकरी म्हणून नाही, तर गावकरी म्हणून जगत आहेत.
175 हा आकडा गणिताच्या दृष्टीने खूप मोठा नसेलही…! पण, अमुक अमुक केलं, तर तमुक तमुक होईल, हे मी आता छातीठोकपणे सांगू शकतो, आणि ते सप्रमाण सिद्धही झालंय, यातच मला आनंद आहे.
175 हा आकडा फार मोठा नसला, तरी , या आकड्याने भल्या मोठ्या प्रमाणात माझा आत्मविश्वास वाढवला आहे हे नक्की … !
तर…. या महिन्यात (1 ते 7 जून ) आणखी पाच जण भीक मागणं सोडून कामाला लागले आहेत.
आता हे वाचून असं वाटेल, की एकाच आठवड्यात पाच लोक कामाला लागले…??? व्वा…व्वा…कित्ती भारी ना… !!!
पण तसं नाही हे…
या पाच नारळांवर, गेल्या तीन वर्षांपासून साम – दाम- दंड- भेद या प्रकाराने घाव घालत होतो, या आठवड्यात ते पाच नारळ फुटले इतकंच…. !
काही का असेना…. माझ्या पदरात पडलेली हि पाच श्रीफलं आहेत असं मी समजतो… !
माझा एक मित्र… जो हा तीन वर्षांपासूनचा माझा प्रवास पाहत आहे… तो मला म्हणाला, ‘अरे छान झालं… पण तू तुझी तीन वर्ष या कामी “खर्च” केलीस ना मित्रा… !
तीन वर्षात फक्त पाच लोक… ? आब्या, फार मोठी achivement नाही वाटत मला ही…. !
त्याच्या या वाक्याने मला निश्चितच वाईट वाटलं….!
पण हरकत नाही…. “टिकाकाराचे घर असावे शेजारी”… ही म्हण मी लहानपणापासून ऐकत आलो आहे.
‘पण तुझी तीन वर्ष या कामी “खर्च” केलीस ना मित्रा…? ‘
मित्राच्या या वाक्याची मात्र मला गंमत वाटली…. मी जे काही केलं त्याला खर्च कसं काय म्हणायचं ?
हि तर माझी इन्व्हेस्टमेंट आहे ना … !
जन्माला घातल्यावर, बाप आपल्या पोरा / पोरींना शाळेत घालतो… शाळा कॉलेजच्या फीया भरतो, वह्या पुस्तकं यांच्यावर खर्च करतो, अजूनही बऱ्याच खस्ता खातो आणि शेवटी आपल्या मुला /मुलीला उभं करतो…
रांगणारं ते मुल, जेव्हा स्वतःच्या पायावर जबाबदार नागरिक म्हणून उभं राहतं…. त्यावेळी बापाचा तो “खर्च” असतो ? की “बापाची इन्व्हेस्टमेंट” ???
मी माझ्या मित्राला म्हणालो, ‘मला फक्त एकच बाप असा दाखव, की ज्याने मुला / मुली च्या जन्मापासून ते, मुलगा / मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत त्याने केलेला “खर्च” ज्याने वहीत मांडून ठेवला आहे… !
‘अरे बाबा, एखाद्याला उभं करणं हा खर्च नसतो…. ती आपली जमापुंजी / बचत असते… Investment असते दोस्त… !’
शेतकरी बीज पेरून, त्या बीजावर पाणी घालतो….खत घालतो… कष्ट करतो…. त्यावेळी तो शेतकरी झालेल्या खर्चाचा विचार करत नाही ….हे बीज आभाळाला कधी भेटेल ? हाच त्यामागे विचार असतो.
असो, तुम्हा सर्वांच्या साथीनं मी तोच बाप होण्याचा, शेतकरी होण्याचा प्रयत्न करत आहे…. !
तर, या महिन्यात पाच जण कामाला लागले !
*एक अंध व्यक्ती, आणि एक ताई…. येणारा पावसाळा लक्षात घेऊन त्यांना छत्र्या विक्रीस घेऊन दिल्या आहेत… !*
*शनिवार वाड्या जवळील कसबा गणपतीची कमान, यासमोर असणारा फुटपाथ, यावर ही ताई छत्र्या, काकड्या आणि इतर काही वस्तू विकते…. !*
*माझा अंध बंधू, जंगली महाराज मंदिरा शेजारी असणाऱ्या फुटपाथ वर, छत्र्या आणि इतर तत्सम वस्तू विकत आहे.*
*तिसरी एक ताई… चतु:शृंगी मंदिराबाहेर हार आणि गजरे विकत आहे…*
*चौथा एक जण, नाना पेठ परिसरात प्लास्टिकच्या वस्तू विकत आहे….*
*पाचवी एक आजी…. पूर्वी बोहारीन म्हणून काम करायची. (नवीन पिढीसाठी सांगतो : बोहारीन म्हणजे, घरोघरी फिरून, लोकांकडून जुने कपडे घेऊन, त्या बदल्यात त्यांना एखादं चांगलं भांडं द्यायचं, मग मिळालेले जुने कपडे, बाजारात विकून त्याचे पैसे घ्यायचे ) तीचा व्यवसाय बंद पडला होता, आता तिला बोहारीन म्हणून का होईना, परंतु तिचा व्यवसाय तिला पूर्ववत करून दिला आहे*
माझ्या या लोकांना ओळखायचं कसं ?
तर… *”आम्ही कष्टकरी आम्ही गावकरी”* या हेडिंग खाली समाजासाठी एक मेसेज लिहिला आहे…. त्याचा बोर्ड त्यांच्या शेजारी लावला आहे.
आपण यांच्याकडून या वस्तू विकत घेऊ शकता…. !
नव्हे घ्याच… !!
जगात अनेक pathy आहेत….
ऍलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी आणि इलेक्ट्रोपॅथी…. आणखीही बऱ्याच….
पण या pathy नी माणसाचं फक्त शरीर बरं होतं…. !
माणसाचं जर मन बरं करायचं असेल, तर Sympathy आणि Empathy नावाच्या आणखी दोन pathy या जगामध्ये उपलब्ध आहेत….
एखाद्याचं दुःख पाहून नुसतीच हळहळ वाटणे, म्हणजे Sympathy….!
परंतु हे दुःख पाहून, त्याला त्या दुःखातून मुक्त करण्यासाठी आपण जे काही करू, त्याला म्हणतात Empathy…. !!
आता वारी जवळ आली आहे… !
एका हातात Sympathy आणि दुसऱ्या हातात Empathy घेऊन आपण त्याचेच टाळ करूयात का ?
एखाद्या अडल्या नडल्या माणसाच्या हाताला हात देऊन, एखादं रिंगण करून, आपणही फेर धरूया का ??
एखाद्या…. फक्त एखाद्याच व्यक्तीला, “विठ्ठल” समजून कधीतरी आपणच “ग्यानबा – तुकाराम” होऊन, त्याची सेवा करूया का ???
आपण जेव्हा हे करू….
त्यावेळी खुद्द विठ्ठल, आपल्या रखुमाईसह आपल्या भेटीस, आपण जिथे असू तिथे येईल…
आणि मग आपण जीथे असू तीच पंढरी होईल…. !!!
विठ्ठल….विठ्ठल… !!!
7 जुन 2023
*डॉ अभिजित सोनवणे*
*डॉक्टर फॉर बेगर्स*
*सोहम ट्रस्ट*
*9822267357*
*sohamtrust2014@gmail.com*
*www.sohamtrust.com*