सावंतवाडी
जो यशामध्ये हुरळून जात नाही,आणि जो अपयशामध्ये देखील खचून जात नाही तोच खरा यशस्वी विद्यार्थी, अर्थात सक्सेस इज नॉट ए डेस्टिनेशन इट्स ए जर्नी असे प्रतिपादन, परफेक्ट अकॅडमी,ओरस चे संस्थापक राजाराम परब यांनी आज कळसुलकर विद्यालय सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले. आज दिनांक 6 जून 2023 रोजी कळसुलकर प्रशालेतील दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राजाराम परब, प्रशालेचे माजी विद्यार्थी डॉक्टर नार्वेकर, श्री मानकर सर, सौ नाईक मॅडम आदी उपस्थित होते. सालाबाद प्रमाणे करसुळकर हायस्कूल चा दहावीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून, यंदा 90% होऊन अधिक गुण असणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचा, प्रशालेमार्फत सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांशी आणि पालकांशी संवाद साधताना, प्राध्यापक राजाराम परब यांनी करिअर कसे निवडावे, सायन्स,कॉमर्स आणि आर्ट्स या विविध शाखांमधील महत्त्वाचे करिअर ऑप्शन्स, तसेच दहावीचे गुण का महत्त्वाचे आहेत आणि, दहावी मध्ये थोडी निराशा जरी असली तरी विद्यार्थी पुढे कसे यशस्वी होऊ शकतात या विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना आपण करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशनासाठी सतत उपलब्ध राहू आणि प्रयत्नशील राहू असे आश्वासन देखील दिले.