You are currently viewing महापालिकेने रस्ते डांबरीकरणाचे कार्यादेश पावसाळ्यानंतर द्यावेत – शशांक बावचकर 

महापालिकेने रस्ते डांबरीकरणाचे कार्यादेश पावसाळ्यानंतर द्यावेत – शशांक बावचकर 

इचलकरंजी : प्रतिनिधी

 

इचलकरंजी महापालिकेने शहरातील रस्ते डांबरीकरण व इतर कामांबाबत निविदा काढली असून पावसाळयाच्या काळात सदर कामे सुमार दर्जाची होण्याची शक्यता आहे. यातून महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असून सदर कामांचे कार्यादेश पावसाळ्यानंतर देण्यात यावेत ,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव व माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत विविध ८४ कामांची निविदा दि. ११ मे रोजी प्रसिध्द केली आहे. सदर भरलेली निविदा सादर करण्याची अंतिम मुदत दि. ५ जून अखेर होती. तसेच दि. ६ जून रोजी सदरच्या निविदा उघडण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. तथापी निविदा प्राप्त झाल्यानंतर सर्व भरलेल्या निविदांच्या कागदपत्रांची छाननी करण्यास व सदर कामाचे कार्यादेश देण्यास विलंब होणार असल्याचे दिसते. सदर कालावधीत पावसाळा सुरु होत असून सदर प्रसिध्द केलेल्या निविदेच्या अटीमध्ये अट क्र. ३ बाबत उलेख केला आहे.

महाराष्ट्र शासनाने ७ जुन २०१६ रोजी रस्ते कामांबाबत परिपत्रक काढले असून त्यामध्ये उष्ण मिश्रीत पध्दतीने करण्यात येणा-या डांबरीकरणाची कामे भारतीय रस्ते महासभेने निर्गमित केलेल्या मानकाप्रमाणे करण्याबाबत तसेच रस्त्याची कामे करताना हवामान व हंगामाचा विचार करुन कामे हातळण्याबाबत मार्गदर्शक सुचना केल्या आहेत. वरील मार्गदर्शक सुचने प्रमाणे रस्ते डांबरीकरणाची कामे १० में पर्यंत पुर्ण करण्यात यावीत असे म्हटले आहे. म्हणजेच पावसाळी हवेचे वातावरण तयार झाल्यास अथवा संपूर्ण पावसाळयाच्या काळामध्ये अशा पध्दतीचे रस्ते विकासकामे व इतर कामे हातामध्ये घेता येणार नाहीत.

त्यामुळे वरील निविदेमध्ये उल्लेख केलेली कामे या काळामध्ये सुरु करणे हे धोकादायक असून महाराष्ट्र शासन व इचलकरंजी महानगरपालिकेच्या निधीची उधळपट्टी करण्यासारखे आहे. निविदेतील एकूण कामे पूर्ण करण्याचा कालावधी ९० दिवसाचा असल्याने त्यांना निविदा उघडल्यानंतर कार्यादेश देण्यात आले तर तो कालावधी पावसाळयामध्ये संपुष्ठात येतो. याचाच अर्थ कार्यादेश तातडीने दिल्यानंतर पावसाळयाच्या काळात वरील सर्व कामे सुमार दर्जाची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरील परिस्थितीचा विचार करुन निविदेतील अट व महाराष्ट्र शासनाच्या ७ / ६ / २०१६ रोजीच्या परिपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करावी व वरील कामांचे कार्यादेश पावसाळयानंतर देण्यात यावेत. यामध्ये घाईगडबडीने कार्यादेश दिले व कामाची सुरुवात केली तर होणा-या नुकसानीस महापालिका प्रशासनास जबाबदार धरून प्रशासनाविरोधात दिवाणी कारवाई करु ,असा इशाराही निवेदनाच्या शेवटी श्री.बावचकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा