You are currently viewing टेलीपथी~मनसंवाद (लघुलेख)

टेलीपथी~मनसंवाद (लघुलेख)

*जागतिक साहित्य कला विकास मंचच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर (मिशिगन,अमेरिका) लिखित अप्रतिम लघुलेख*

 

*टेलीपथी~मनसंवाद(लघुलेख)*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एखाद्याच्या मनात काय चालले आहे ह्याची जाणीव शारिरीक किंवा एखाद्या उपलब्ध साधनाशिवाय दुसर्‍यास होणे म्हणजे टेलीपथी.

“अग,आज सकाळपासून मला एकसारखी तुझीच आठवण येत होती आणि इतक्या दिवसांनी आजच तू मला भेटलीस.”असा अनुभव बर्‍याचदा आपल्याला येतो.हीच टेलीपथी.सहावा सेन्स जो म्हणतात तो हाच असावा.

१८८२ साली W.H.Fredrick ह्या मानसशास्त्रज्ञाने ह्या प्रक्रियेला टेलीपथी अशी संज्ञा दिली. दोन माणसे या टेलीपथीने एकमेकांशी जोडली जातात.

कित्येकदा काहीही कारण नसताना दिवसभर उद्विग्न वाटते,मनाला कसलीतरी हुरहुर लागते आणि खरोखरीच दुसर्‍यादिवशी किंवा नजीकच्या काळात काहीतरी दुर्घटना घडल्याचे किंवा एखादी दुःखद बातमी आपल्याला समजते.म्हणजे आंतर्मनाला काहीतरी आधीच संकेत मिळालेला असतो.

कधी कधी स्वप्नातही आपण एखादी भविष्यात घडणारी गोष्ट जशीच्या तशी अनुभवितो.ह्याचाच अर्थ टेलीपथीने आपण त्या व्यक्तीशी किंवा घटनेशी जोडले जातो.समोरच्या माणसाने कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याला त्याच्या मनात नेमके काय चालले आहे हे बरोबर ओळखता येते.

तरूण मुलगा आणि तरूण मुलगी प्रथम भेटीतच एकमेकांच्या प्रेमात पडतात.प्रथम तुज पाहता जीव वेडावला अशी त्यांची मानसिक अवस्था होते.कोणी कुणाला त्यांच्या मनाची अवस्था सांगत नाही पण दोघेही एकमेकात गुंतले जातात.हेही टेलीपथीचेच कार्य असावे.

माणसांतच काय पण जनावरांमध्येही अशी टेलीपथी असते.मला पक्के आठवते,१९६७ साली मुंबई आणि परिसरात जवळ जवळ ९ रिस्टर स्केल इतका मोठा भूकंप झाला होता.ही घटना घडण्याआधी दोन दिवस रस्त्यावरचे कुत्रे एकसारखे रडत होते.तेव्हाच माझी आजी म्हणाली होती,”काहीतरी अघटीत घडणार आहे बहुधा. कुत्र्यांना कळतं.”

तेव्हा टेलीपथीने असे संकेत मिळतात.

 

*अरूणा मुल्हेरकर*

मिशिगन, अमेरिका

प्रतिक्रिया व्यक्त करा