*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या लेखिका कवयित्री सौ. राधिका भांडारकर लिखित सायकल दिनानिमीत्त अप्रतिम लेख*
*चला सायकल चालवूया…*
माझं आणि सायकलचं नातं अतूट आहे…
आजही मला काळ्याभोर डांबरी ,मोकळ्या रस्त्यावरून
मस्त “बनके पंछी गाये प्यारका तराना…”असे नूतन फेम गीत गात बेभान सायकल चालवायला आवडेल.मस्त गार हवा,आजुबाजुची हिरवळ,निळे डोंगर…वाह! क्या बात है!!
असो! पण सध्या मी जीम मधेच सायकल चालवण्याचा आनंद घेतअसते!
पण या सायकल सफारीशी खूप आठवणी जुडलेल्या आहेत. मे महिन्याची सुट्टी लागली की आम्ही गल्लीतली सगळी मुलं मुली सेंट्रल मैदानात भाड्याची सायकल फिरवत असू.एका तासाचे अडीच आणे भाडं!पण तेही सहजासहजी मिळायचे नाहीत ,त्यासाठी वडीलांना अडीचक्याचा पाढा तोंडपाठ म्हणून दाखवावा लागायचा…आता मुलांचे तीस पर्यंत तरी पाढे पाठ असतात की नाही कोण जाणे!! तेव्हां कुठे होते कॅलक्युलेटर्स..संगणक..
तर माझ्या सायकल शिकण्याची गोष्ट अशी अडीचक्यापासून सुरु होते..गल्लीतल्या मुलांनीच मला सायकल शिकवली. एक सवंगडी फार शहाणा होता.
मला चिडवत म्हणाला,”तुला कधीही सायकल चालवता येणार नाही…तुला बॅलन्सींगचं तंत्रच कळत नाही…..”
माझा इगो प्रचंड तुटला.मग त्याला दाखवण्यासाठी मी
सायकलवरुन सुसाट निघाले…जिथे मैदान संपत होते
तिथे खड्डा होता…तो मागून पळत ओरडत होता..
“”मूर्ख..ब्रेक्स लाव ..ब्रेक्स लाव…””
सायकलसकट मी खड्ड्यात आपटले..भरपूर लागले…
मात्र माझ्या त्या सो काॅल्ड मित्राने मला काय फिल्म स्टाईल उचलून वगैरे खड्यातून बाहेर आणले नाही बरं का!!तो मस्त खिदळतच राहिला…
सायकल आणि ही आठवण सतत हातात हात घालून
असतात…मात्र या आठवणीने मला दोन गोष्टी शिकवल्या.एक..मी सायकल चालवायला शिकले..आणि
दुसरी महत्वाची..जी आयुष्याला लागू पडली..योग्य बॅलन्सींग आणि योग्य वेळी ,अपघात टाळण्यासाठी ब्रेक्स लावणे….
त्यानंतर मी जेव्हां,जिथे संधी मिळाली तेव्हां तिथे मनसोक्त सायकल चालवली.आजही मला ही इको फ्रेंडली
सायकल रपेट फार आवडते….
पर्यावरणीय संदेश देताना ,मला म्हणावेसे वाटते,चला सायकल चालवूया..प्रदूषण टाळूया..””
नाहीतर”सायकल चालवा ।आरोग्य कमवा।…
सौ. राधिका भांडारकर
पुणे