इचलकरंजी / प्रतिनिधी :
येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये आजी-माजी विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभाग व माजी विद्यार्थिनी संघटनेतर्फे आयोजित या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्रसिद्ध खो – खो आणि कबड्डीपटू स्मिता बुगड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.तसेच शाहीन चौगुले आणि श्वेता जाधव या माजी विद्यार्थिनींची देखील प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुण्या स्मिता बुगड म्हणाल्या, विद्यार्थिनींनी महाविद्यालयाशी असणारे आपले ऋणानुबंध आयुष्यभर जपावेत.कारण महाविद्यालयाच्या या तीन वर्षांमध्ये जे काही ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार आपण मिळवले आहेत, ते आयुष्यात येणाऱ्या संकटाशी सामना करायला आपल्याला निश्चितच मदत करतील.
तसेच विद्यार्थिनींनी आपल्यातल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन इथेच न थांबता आयुष्यात यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करावीत,असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी शाहीन चौगुले यांनी समाज कल्याण विभागात नोकरी करत असताना येणारे अनेक अनुभव सांगितले. तर श्वेता जाधव यांनी व्यवसायामध्येसुद्धा आपण खूप चांगले करिअर करू शकतो आणि त्याचे चांगले उदाहरण त्या स्वतः आहेत, असे मत व्यक्त केले.
यावेळी अनेक विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. अनेक प्राध्यापकांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. त्रिशला कदम यांनी विद्यार्थिनींना भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आम्ही दिलेले ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार जपावेत, असा मोलाचा सल्ला दिला. त्या स्वतः कन्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच्या विद्यार्थिनी आहेत. एक विद्यार्थिनी ते याच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदापर्यंतचा प्रवास त्यांनी उलगडून सांगितला.तसेच यातून काहीतरी प्रेरणा घेऊन या सर्व आजी-माजी विद्यार्थिनींनी आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करावे, असे सांगितले.
यावेळी स्वागत आणि प्रास्ताविक गृह विज्ञान विभाग प्रमुख प्रा.सौ संगीता पाटील यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा संदीप पाटील यांनी तसेच आभार डॉ.संपदा टिपकुर्ले यांनी मानले.
यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी – माजी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.