वैभववाडी
संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा ग्राहक असून याच ग्राहकाला योग्य सुविधा आणि न्याय मिळतोच असे नाही. बँक ऑफ इंडिया वैभववाडी शाखेत ग्राहकांना योग्य सुविधा मिळत नसल्याबाबतच्या तक्रारी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेकडे आलेल्या आहेत. यासंदर्भात बँकेने ग्राहकाभिमुख सुविधा देऊन ग्राहकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी झोनल ऑफिसर, बँक ऑफ इंडिया रत्नागिरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरबीआय च्या नवीन धोरणानुसार सर्व बॕकांच्या कामकाजाच्या वेळा व सुविधेबाबत नवीन निर्देश दिलेले आहेत. असे असताना बॕक आॕफ इंडिया शाखा वैभववाडी यांनी प्रसिद्ध केलेल्या बॕक वेळापत्रकात कामकाज वेळ सकाळी १०.३० ते दुपारी २.३० आणि २.३० ते ३.०० जेवणाची वेळ (लंच ब्रेक) आणि दुपारी ३.०० ते ४.०० अशी कामकाज वेळ जाहीर केलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुपारी २.३० ते ३.०० या जेवणाच्यावेळी पूर्ण बँक बंद केली जाते आणि सर्व ग्राहकांना बँके बाहेर ताटकळत उभे केले जाते. ही वस्तुस्थिती आहे. याबाबत ग्राहकांच्या आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. तसेच गर्दी असो अगर नसो एकच काउंटर सुरू करून ग्राहकांना वेटीस धरले जात आहे. वैभववाडी हे तालुक्याचे ठिकाण असून अनेक ग्राहक आपल्या बँकेशी संबंधित आहेत. यामध्ये अनेक पेन्शन धारक, वयस्क, ज्येष्ठ नागरिक यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. प्रत्येक महिन्याच्या दिनांक १ ते १५ तारखेपर्यंत बँकेमध्ये जास्त गर्दी असते. किमान या कालावधीत तरी दोन काउंटरची सुविधा उपलब्ध केल्यास ग्राहकांची गैरसोय दूर होईल. तसेच वैभववाडीचा आठवडी बाजार हा बुधवारी असल्याने या दिवशी बँकेत जास्त गर्दी होते. या सर्व बाबींचा विचार करता आपण यामध्ये लक्ष घालून बॕकेकडून मिळणाऱ्या या असुविधेमध्ये सुधारणा होणे अपेक्षित आहे.
मी स्वतः आजच वैभववाडी शाखा व्यवस्थापक यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती समजावून सांगितली. पण त्यांच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. आपल्याला जे काही सांगायचं आहे, ते आमच्या वरिष्ठांकडे कळवा. अशाप्रकारे त्यांच्याकडून उत्तर मिळाले. मी ०२३५२-२२२३६१ या नंबरवरुन आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या कार्यालयाचा एकही फोन लागत नाही. मी आपल्याकडे या पत्राव्दारे ह्या समस्या कळवित आहे. आपण यामध्ये लक्ष घालून ताबडतोब वरील मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशी विनंती करीत आहे.
आम्ही केलेल्या सूचनांवर योग्य कार्यवाही करावी. तसेच आपण केलेल्या कार्यवाही बाबत पत्रोत्तर व्हावे, अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कोकण विभाग प्रभारी अध्यक्ष तसेच सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व अशासकीय सदस्य जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद प्रा. एस.एन. पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष संदेश तुळसंकर, वैभववाडी तालुका संघटक शंकर स्वामी यांनी निवेदनात नमूद केली आहे.