देवगड:
भाजपा जिल्हा सरचिटणीस व इळये गावचे सरपंच जयदेव भास्कर कदम वय वर्षे ५१ यांचे मंगळवारी सायंकाळी ४ वाजता शिरगाव येथे अल्पशा आजाराने निधन झाले. शिरगाव निमतवाडी येथे मेव्हण्याच्या घरी कार्यक्रमानिमित्त सोमवारी ते गेले होते. मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शिरगाव येथे डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उच्चारापूर्वी त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेली काही वर्षे ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.
भाजपा संघाच्या विचारांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच घरातूनच मिळाले होते. कॉलेज जीवनात भाजपा प्रणित अभाविप संघटनेचे ते काम करीत होते. या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली त्यानंतर भाजपा पक्षाच्या विविध प्रमुख पदावर त्यांनी काम केले. भाजपा तालुका सरचिटणीस, भाजपा तालुकाध्यक्ष, भाजपा जिल्हा सरचिटणीस, देवगड तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष, इळये गाव तंटामुक्त समिती अध्यक्ष अशा विविध पदांवर त्यांनी काम पाहिले.
तळवडे पंचायत समिती निवडणूक ही ते लढले मात्र त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इळये ग्रामपंचायत निवडणुकीत ते विजयी झाले व गावचे सरपंच झाले. सरपंचपदावर त्यांनी चांगले काम केले मात्र प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. भाजपा पक्ष संघटना वाढवण्यासाठी त्यांचे मोठे योगदान होते. गेली दोन-तीन वर्षे ते किडनीच्या आजारांनी त्रस्त होते. तळागाळातील कार्यकर्त्यांशी सतत संपर्क ठेवणारे नेतृत्व होते. राजकारणाबरोबरच त्यांनी समाजकारणातही स्वतःला झोकुन दिले होते. सामाजिक कार्यातही त्यांनी वाहून घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समजतात आम. नितेश राणे, माजी आम. ॲड. अजित गोगटे, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर आदी भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. बुधवारी सकाळी इळये या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.