समीर नलावडे, बंडू हर्णे यांनी वेधले होते बांधकाम मंत्र्यांचे लक्ष
कणकवली
गेली कित्येक वर्ष कणकवली व जानवलीला जोडणाऱ्या जानवली नदीवरील गणपती साना येथील केटी बंधाऱ्याच्या कामाची मागणी आता पूर्ण होण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.
जानवली नदीवर या ठिकाणी केटी बंधारा करण्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच कणकवलीतील विकास कामांची भूमिपूजन करताना गणपती सान्याच्या ठिकाणी होत असलेल्या बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या कामाची पाहणी केली होती. या पाहणी दरम्यान तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे व तत्कालीन उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी या केटी बंधाऱ्याच्या कामाच्या मागणीचा पुनरुच्चार केला होता. राष्ट्रवादीचे तत्कालीन नगरसेवक अबीद नाईक यांनी देखील याबाबत लक्ष वेधले होते. व त्यावेळी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांना सदर कामाचे अंदाजपत्रक बनवून सादर करा अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर याबाबतची लेखी मागणी देखील माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली होती. या सर्व घडामोडीनंतर आता या कामाच्या दृष्टीने हालचाली सुरू होऊ लागल्या आहेत. जानवली नदीवर या ठिकाणी केटी बंधारा करण्याच्या दृष्टीने माती परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. नदीच्या दोन्ही बाजूने मातीची चाचणी करून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही केली जाणार आहे. याकरिता प्रत्यक्षात माती परीक्षणाचे काम सुरू झाल्याने माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच येत्या काळात लवकरात लवकर हा केटी बंधारा मंजूर होऊन पूर्णत्वास जाईल अशी ग्वाही देखील श्री नलावडे यांनी दिली आहे. जेणेकरून जानवली गाव व कणकवली शहर या बंधाऱ्यामुळे अजून जवळ येणार असून रहदारीचा एक नवीन मार्ग देखील यामुळे मोकळा होणार आहे. तसेच कणकवली शहरातील ग्रामीण भाग या केटी बंधाऱ्याद्वारे जानवली गावाशी थेटपणे जोडला जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात याचा फायदा कणकवली शहरवासीयांसोबतच आसपास च्या नागरिकांना देखील होणार आहे.