सावंतवाडी
आठवडा बाजारासाठी येथील गोदामाकडील जागा निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडुन युध्द पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येणार्या बाजारापुर्वी या सुविधा देण्याचा पालिकेचा मानस आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात लाईटची व्यवस्था करण्यात आल्यानंतर आता डांबरीकरण आणि नाल्याची दुरूस्ती केली जात आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यानुसार हे काम केले जात आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडुन देण्यात आली.
येथील मोती तलावाच्या काठावर असलेला बाजार अखेर गोदामाच्या परिसरात असलेल्या जागेत हलविण्यात आला आहे. दरम्यान त्या ठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा नसल्याने बाजारासाठी येणार्या व्यापार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्या ठिकाणी चिखल होणार आहे, नाल्यातील पाणी बाहेर आल्यामुळे भाजी खराब होणार आहे, अशी शक्यता व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी मंंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला आहे. दरम्यान यासाठी आपण पन्नास लाख रुपयाचा निधी उपलब्ध करुन देतो, असे श्री. केसरकर यांनी आश्वासन दिले होते. त्यानुसार त्या ठिकाणी हे काम सुरू करण्यात आले आहे. काल पासून त्या ठिकाणी खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम हातात घेण्यात आले आहे. आता नाल्यात पाईप घालून पावसाचे पाणी वर येणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. तसेच लाईटची व्यवस्था करण्यात आली असून फिरते शौचालय उपलब्ध करुन दिले जाणार आहे, तसेच परिसरात असलेली झाडे लवकरच तोडण्यात येणार आहे, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.