*वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल आणि मुंबई लोहमार्ग पोलिसांची सीपीआर प्रशिक्षणासाठी झाली युती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोच्च प्राधान्य*
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थिती सक्षमपणे सांभाळण्यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल यांनी मुंबई लोहमार्ग पोलिस आणि कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्डिओ पल्मोनरी रिसुसिटेशन (सीपीआर) प्रशिक्षण कार्यक्रम वाडी बंदर, माझगाव, सेंट्रल रेल्वे येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रेल्वे पोलीस आणि कर्मचार्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी त्यांच्या प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासाला प्राधान्य देण्यासाठी रुग्णालयाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. यावेळी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह ५० पेक्षा अधिक रेल्वे कर्मचारी उपस्थित होते.
वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती प्रभावीपणे हाताळण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना आवश्यक जीवनरक्षक कौशल्यांनी सुसज्ज करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. त्यात रेल्वे कर्मचाऱ्यांनी सक्रियपणे सहभाग घेतला. सर्वांनी सीपीआर तंत्रे समजून घेण्यासाठी, त्यात प्राविण्य मिळवण्यासाठी आणि आत्मविश्वास वृद्धिंगत करण्यासाठी सराव आणि सिम्युलेशन व्यायामामध्ये हिरिरीने सहभाग नोंदवला. सीपीआर ही एक गंभीर आणीबाणीची प्रक्रिया आहे जी हृदयविकाराच्या वेळी आणि इतर वैद्यकीय संकटांदरम्यान रुग्णाची जगण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढवू शकते.
या उपक्रमामागील उद्देश सांगताना, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे म्हणाले, “आमच्या प्रवाशांची सुरक्षा आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्याची आहे आणि आमच्या कर्मचार्यांना सीपीआर सारख्या जीवनरक्षक कौशल्यांनी सुसज्ज करणे हे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती कधीही उद्भवू शकते आणि सीपीआरमुळे प्रशिक्षित कर्मचारी जलद आणि प्रभावीपणे प्राथमिक वैद्यकीय मदत देण्यासाठी सक्षम होतील आणि ते एखाद्याचा अनमोल जीव वाचवू शकतील. ह्या उपक्रमाद्वारे आम्ही आमच्या रेल्वे प्रवाशांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्याची आमची बांधिलकी जपत आहोत. वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय प्रशिक्षण चमूने आमची कौशल्ये विकसीत करण्यासाठी दिलेल्या ह्या योगदानासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो. मुंबईच्या विविध विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.”
डॉ. मिहीर शाह, इमर्जन्सी मेडिसिन फिजिशियन, वोक्हार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल यांनी या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आणि म्हणाले, “रेल्वे पोलिस आणि गार्ड्सना सीपीआर प्रशिक्षण देऊन, आम्ही त्यांना जीव वाचवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि कौशल्ये देऊन सुसज्ज करत आहोत. वैद्यकीय आणीबाणीच्या काळात त्यांना प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी ह्या प्रशिक्षणाचा उपयोग होऊ शकतो. रेल्वे दररोज लाखो प्रवाशांसाठी जीवनरेखा म्हणून काम करते आणि सीपीआर प्रशिक्षणासह कर्मचार्यांना सक्षम बनवल्याने सर्व प्रवाशांची सुरक्षा वाढवण्याच्या या महत्त्वाच्या प्रयत्नाचा भाग असल्याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.”