वातावरणाचा अंदाज घेऊन होडी, जलक्रीडा व्यवसायांना मुदतवाढ द्यावी – हरी खोबरेकर
मेरिटाईम बोर्डाकडे मागणी…
मालवण
येथील पर्यटन हंगामाची उद्या अधिकृत सांगता होत असली तरी समुद्रातील वातावरणाचा अंदाज घेत पर्यटन व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने काही दिवसांसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.
सप्टेंबर पासून सुरू झालेल्या पर्यटन हंगामाची येत्या २५ मे रोजी सांगता होत आहे. या हंगामाच्या सुरवातीपासून वादळसदृश परिस्थिती तसेच अन्य कारणांमुळे जलक्रीडा, किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवावी लागली. प्रत्यक्षात हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांचा ओघ हा जास्त असतो. पुढील पावसाळी हंगामाची चांगली बेगमी याच दिवसात व्यावसायिकांना मिळते.
मेरिटाईम बोर्डाने २६ मे पासून जलक्रीडा, किल्ले प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. सद्यस्थितीत समुद्रातील वातावरण अद्यापही चांगले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून जलक्रीडा व किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवेसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी श्री. खोबरेकर यांनी केली आहे.