इचलकरंजी/प्रतिनिधी :
प्रदीर्घ काळापासून इचलकरंजीकरांना प्रतिक्षा असलेले उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने इचलकरंजीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या संदर्भातील अध्यादेश आठवडाभरात जारी होऊन 10 जूनपर्यंत हे कार्यालय सुरु होईल, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे लवकरच नवीन आरटीओ नोंदणी क्रमांकही वस्त्रनगरीला मिळेल, असेही ते म्हणाले. या कार्यालयामुळे इचलकरंजीला जिल्हास्तरीय दर्जा प्राप्त होणार आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील या मान्यवरांच्या हस्ते 28 जून रोजी तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन करण्याचा मानस असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले.
ते म्हणाले, कोल्हापूरनंतर जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून इचलकरंजीची ओळख आहे. शहराचा वाढता विस्तार व भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन याठिकाणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु व्हावे यासाठी मागील तीन वर्षापासून मी शासन स्तरावर पाठपुरावा करत होतो. परंत महाविकास आघाडी शासनाच्या काळात त्यासाठी असहकार्य मिळाले. परंतु सत्ता बदलानंतर आता प्रलंबित सर्वच कामे मार्गी लागत आहेत. त्याच अनुषंगाने इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास मंजूरी मिळाली आहे. त्याचबरोबर कार्यालयासाठी आवश्यक 45 ते 55 जणांचा स्टाफही उपलब्ध होणार आहे.हे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय हातकणंगले व शिरोळ या दोन्ही तालुक्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या कार्यालयासाठी लालनगर परिसरातील गारमेंट प्रशिक्षण केंद्राची सध्या वापरात नसलेली इमारत अत्यंत उपयोगी आहे. जवळपास 42 गुंठे जागेत 45 हजार स्क्वेअरफुटाची तीन मजली इमारत आहे. ती जागा भाडेतत्वावर उपलब्ध करुन द्यावी यासाठी आपण महापालिका प्रशासनाला पत्रही दिले आहे. येत्या आठवडाभरात आवश्यक ते सर्व सोपस्कर पूर्ण होऊन या संदर्भातील अध्यादेश जारी होईल. आणि 10 जूनपर्यंत हे कार्यालय सुरु होईल, असे ते म्हणाले.
येत्या 28 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. याचदिवशी या मान्यवरांचे हस्ते तारदाळ येथील कल्लाप्पाण्णा आवाडे को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) संस्थेच्या जागेत संस्थेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ब्रेक टेस्ट ट्रॅकचे उद्घाटन करण्याचा मानस असल्याचेही आमदार आवाडे यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण वाहनसंख्येपैकी हातकणंगले व शिरोळ तालुक्यात 45 टक्के वाहने आहेत. त्यामध्ये रिक्षा, लहान टेम्पो, तीनचाकी टेम्पो प्रकारातील वाहने अधिक आहेत. या वाहनांच्या पासिंगसाठी शहर व परिसरात ट्रॅकउपलब्ध नसल्याने सर्वांना कोल्हापूर येथील आरटीओ कार्यालयात जावे लागते. तर पासिंग ट्रॅक मोरेवाडी येथे असल्याने त्याठिकाणी जावून पासिंग करावे लागते. त्यासाठी केएटीपी संस्थेच्या वतीने तारदाळ येथील संस्थेच्या जागेवर स्वखर्चातून ट्रॅक तयार करुन देण्यात आला आहे.
या पत्रकार परिषदेस प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, स्वप्निल आवाडे, डॉ. राहुल आवाडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, महावीर कुरुंदवाडे, सचिन हेरवाडे, नरसिंह पारीक, राहुल घाट, अनिल शिकलगार आदी उपस्थित होते.