इचलकरंजीत आजपासून राज्य निमंत्रीत हॉकी स्पर्धा
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजीचे भाग्यविधाते स्वातंत्र्य सेनानी माजी आमदार कै. दे.भ. बाबासाहेब खंजीरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त इचलकरंजी शहरामध्ये विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन स्थानिक क्रीडा संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. हॉकी खेळासाठी कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र स्पोर्टस् क्लबच्या वतीने हॉकी कोल्हापूर व हॉकी महाराष्ट्र, पुणे यांचे मान्यतेने दि. २४ ते २८ मे अखेर राज्यस्तरीय निमंत्रीत पुरुष गट हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ह्या स्पर्धेमध्ये कोल्हापूर पोलिस संघासह जिल्हयातील सर्वोत्कृष्ट ५ संघ सांगली, इस्लामपूर, सातारा, फलटण, हॉकी महाराष्ट, पुणे या व स्थानिक २ संघांसह १२ संघ सहभागी होणार आहेत. साखळी व बाद पध्दतीने होणाऱ्या या स्पर्धेतील विजेत्या संघास दे.भ. बाबासाहेब खंजीरे चषक व रोख रक्कम रु.२५,०००/- तसेच उपविजेता यास रोख रक्कम रु.१५,०००/- अशी पारितोषीके देण्यात येणार असून इतरही प्रोत्साहनात्मक बक्षीसे देण्यात येणार आहेत. सहभागी संघांची राहण्यासह, प्रवास व भोजनाची सोय आयोजकांचे वतीने करण्यात येणार आहे.
राहुल खंजीरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र स्पोर्टस् क्बलचे विजय पाटील, मिलिंद कांबळे, राजु बोरगांवे, संतोष शेळके, अरुण मनोळे, उदय मेटे, अनिल बेलेकर, सुहास पाटील, नितिन डंबाळ यांचेसह सर्व हॉकी खेळाडू व कार्यकर्ते स्पर्धा यशस्वी करणेसाठी परिश्रम घेत आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या दे.भ. बाबासाहेब खंजीरे हॉकी क्रिडांगणावर १३ वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचे आयोजन होत असल्याने हॉकी क्रिडाप्रेमी तसेच नागरिकांमध्ये चैतन्याने वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी असून साखळी पध्दतीने स्पर्धा होणार आहेत. सामने दि. २५ मे ते २७ मे २०२३ या कालावधीत रोज सकाळी ९ ते ११ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन २४ मे रोजी सकाळी ९.३० वाजता माजी आमदार सुरेश हाळवणकर, रविंद्र माने शिवसेना जिल्हा प्रमुख, अनिल स्वामी चेअरमन वीरशैव सहकारी बँक लि;कोल्हापूर, प्रदिप ठेंगल अतिरिक्त आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका ,रवी रजपुते माजी उपनगराध्यक्ष इचलकरंजी नगरपालिका ,सौ. सुरेखा पाटील अध्यक्ष हॉकी कोल्हापूर, मोहन भांडवले सचीव हॉकी कोल्हापूर यांचे हस्ते होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना रविवार दि. २८ मे रोजी सायंकाळी ४.३० वा. होणार असून सामन्यानंतर पारितोषीक वितरण समारंभ खासदार धैर्यशील माने, कृष्ण प्रकाश, डी. जी. भारतीय पोलीस सेवा, आमदार राजू बाबा आवळे, अशोक स्वामी चेअरमन व्यंकटेश सहकारी सुत गिरणी ,सुधाकर देशमुख आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका,मनीष आनंद सेक्रेटरी हॉकी कोल्हापूर यांचे हस्ते होणार आहे.
क्रीडा शौकिनांना या सामन्यांचा आनंद लुटता यावा यासाठी प्रेक्षा गॅलरी ची व्यवस्था करणेत आली आहे. स्पर्धा यशस्वी करणेकरिता स्पर्धेची जय्यत तयारी करणेत आली आहे. तरी सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन देशभक्त बाबासाहेब खंजिरे जन्मशताब्दी समितीचे कार्याध्यक्ष राहुल खंजिरे व महाराष्ट्र स्पोर्टस् क्बलचे विजय पाटील यांनी केले आहे.