You are currently viewing पुन्हा खालीस्तान 

पुन्हा खालीस्तान 

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा लेख –

 

पुन्हा खालीस्तान

 

८०च्या दशकात सैन्यात असताना आम्ही पंजाबमध्ये खालिस्तान विरुद्ध लढलो. तो एक प्रचंड संघर्ष होता. त्यावेळी अनेक पंजाबमधील माजी सैनिक आणि सैनिक खालिस्तानमध्ये जाण्याच्या स्वप्नाने प्रेरित झाले होते. त्यावेळी परमजित सिंह खालीस्तानी कमांडो फोर्स (KCF) मध्ये अत्यंत आक्रमक होता. नुकतेच ६ मे, २००३ ला त्याची लाहोर पाकिस्तान मध्ये हत्या झाली. दोन युवकांनी मोटरसायकलीवर येऊन त्याची हत्या केली. हत्या बहुतेक ड्रग्स स्मगलरने केली आहे. खालिस्तानची चळवळ ड्रग्स स्मगलरशी जोडली गेली आहे. पाकिस्तान आयएसआयने विद्रोही लोकांना प्रशिक्षण तर दिलेच, पण दहशतवादी चळवळ उभी करताना त्याचे आर्थिक रूप सुद्धा बनवले. म्हणून अफगाणिस्तान मध्ये निर्माण होणारी अफु, पाकिस्तानमध्ये प्रक्रिया केली जाते. तिचे ब्राऊन शुगर किंवा हीरोइन मध्ये परिवर्तन केले जाते. मग हे ड्रग्स प्रामुख्याने भारतात येतात व अनेक मार्गाने इराणद्वारे पश्चिम युरोपमध्ये जात असतील किंवा रशियामधून युरोपमध्ये जात असतील व आफ्रिकेमधून युरोपमध्ये जातात. अशाप्रकारच्या ड्रग्सना भारी मात्रांमध्ये किंमत युरोपमध्ये मिळते. या ड्रग्सची तस्करी करण्यासाठी आयएसआयने माफिया टोळ्या उभ्या केल्या. त्यातलीच एक आंतरराष्ट्रीय टोळी भारतातून निर्माण झाली. ती म्हणजे दाऊद इब्राहिमची टोळी. मुंबईमध्ये मोठी टोळी बनवल्यानंतर पोलीस जेव्हा दाऊद इब्राहिमला पकडायला जाणार होते, त्यावेळेला एका मोठ्या मंत्र्यांनी दाऊदला तशी सूचना दिली की पोलीस येत आहेत, फरार हो. त्यावेळी भेंडीबाजार, मुसाफीर खान्यात दाऊद इब्राहिमची टोळी राहत होती. नाट्यमय पद्धतीने पोलीस पोहचायच्या अगोदर मंत्र्याच्या सूचनेमुळे दाऊद इब्राहिमची टोळी फरार झाली. ८०च्या दशकात ही घटना घडली, तेव्हापासून दाऊद परत महाराष्ट्रात किंवा भारतात आलाच नाही.

दाऊद इब्राहिमने दुबईमध्ये आपलं साम्राज्य प्रस्थापित केले. १९९३च्या ब्लास्ट नंतर दाऊद कराचीत जाऊन राहू लागला. तिथे त्याच्यावर प्राणघातक हल्ले सुद्धा झाले. पण तो वाचला आणि ड्रग्सच्या जागतिक शहनशहा झाला आहे. त्याची संपत्ती ही अंबानी अडाणी पेक्षा जास्त आहे. सर्व दहशतवादी टोळ्या त्याच्यावर अवलंबून आहेत किंवा त्याच्याबरोबर सहकार्य करत आहेत. पाकिस्तानमध्ये भारताच्या अनेक दहशतवादी टोळ्या आहेत. त्यातून ते दाऊद सारख्या माफियांसाठी ड्रग्स स्मगलिंग करतात व त्या बदल्यांमध्ये पैसे कमवतात आणि हत्यार विकत घेतात. म्हणून मी माझ्या लिखाणाची सुरुवात ड्रग्स स्मगलिंग आणि दहशतवादाच्या विषयात सुरू केले. कारण याचा भारताला सर्वात जास्त धोका आहे. हजारो सैनिक ह्या कुटील संबंधामुळे मारले गेले आहेत. १९८०पासून आतापर्यंत जवळजवळ दहा हजार सैनिक मारले गेले. ड्रग्सची संख्या रोज वाढत आहे आणि शासन भरकटत चालले आहे. अनेक गुप्तहेर एजन्सी बनवून चुकीची माहिती निर्माण करतात. खरे आरोपी तर मुंबई, दिल्ली, बेंगलोर येथे अति श्रीमंताचे जीवन जगत आहेत.

ड्रग्स मध्ये मिळणार्‍या पैशाचा वापर ते उद्योगात करतात, सिनेसृष्टीत करतात, शेअर बाजारात करतात आणि अनेक कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे. यास्तव मनीलॉन्ड्रीग कायद्यासाठी मी आग्रह धरला होता. कारण जोपर्यंत गुन्हेगारांना त्यांच्या पैशाचा वापर करता येत नाही, तोपर्यंत गुन्हेगारी वाढणार नाही. पण आज काल सर्रास ड्रग्सच्या पैशाचा वापर दहशतवादासाठी केला जात आहे. ड्रग्सचा काळा पैसा पांढरा करण्यासाठी बँकाचा प्रामुख्याने उपयोग होतो. त्यानंतर हा पैसा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये गुंतवला जातो. त्यासाठीच आम्ही मनीलॉन्ड्रीग कायद्यासाठी मागणी केली होती. अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर तो कायदा झाला व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत झाला. दहशतवाद आणि गुन्हेगारीतून निर्माण होणारा पैसा गुन्हेगारांच्या हातामध्ये जाऊ नये हे ED चे प्रमुख मिशन आहे. पण आज ED काय करत आहे ते सर्वांनाच माहित आहे.

सर्व व्यवस्था नीट चालावी आणि भारतामध्ये प्रचंड संघर्ष व्हावा, यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने जंग जंग पछाडले आहे. यांनी काश्मिरमध्ये तर दहशतवाद निर्माण केलाच आहे. पण सर्वात जास्त परिणाम पंजाबमध्ये झाला. दहशतवाद्यांकडून इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर एक प्रचंड मोहीम घेण्यात आली आणि १९९२पर्यंत पंजाबचा दहशतवाद संपुष्टात आला. या काळामध्ये भारतीय सैन्याला विषाची परीक्षा द्यावी लागली. त्यात भारतीय सैन्य विजयी ठरले. कारण पंजाब हे असे क्षेत्र आहे की शेतकऱ्यांच्या चळवळीमुळे, कृषीच्या बाबतीत भारतातील एक नंबरचे राज्य ठरले. आज कुडता पंजाब येथे एवढी भयानक परिस्थिती आहे कि पंजाब बेचिराग झाला आहे व पुन्हा खालीस्तानी चळवळ मजबूत होताना दिसत आहे. अलिकडच्या काळामध्ये अमृतपाल नामक धर्मगुरू दुबईहून पंजाब मध्ये उतरले आहेत व त्याने तत्कालीन धर्मगुरू जर्निलसिंग भिंद्रणवाले प्रमाणे वागायला सुरू केले आहे. ही चळवळ वाढत असताना सरकारने नुसती बघ्याची भूमिका घेतली आहे.

अमृतपाल सिंह यांनी भारतामध्ये एका पंथाचे नेतृत्व करायला सुरू केले आहे. त्या पंथाचे नाव ‘वारिस पंजाब डे’ आहे. गेल्या मार्च मध्ये अमृतपाल सिंहच्या अनेक सहकार्‍यांना पकडण्यात आले. पण अमृतपाल सिंह हा पळून गेला. त्यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण झाला आहे की, पंजाब पोलिस आणि केंद्रीय गृह मंत्रालय हे अमृतपालला सोडण्यासाठी मदत करतात. अमृतपाल अनेक व्हिडिओ प्रकाशित करतो व त्यात खालीस्तानचा प्रचार करतो. पंजाब पोलिसांनी अनेक राज्यामध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तरखंड मध्ये तो दिसला असे कळल्याने पोलिसांनी चौकशीचा जोर वाढवला आहे. मध्यंतरी अफवा निर्माण झाली की तो नांदेड येथे महाराष्ट्रात लपला आहे. तसेच पाकिस्तान आयएसआयने त्याला सुखरूपपणे नेपाळ मध्ये पोहचवले आहे. मध्ये हरियाणामधील एका बाईला पोलिसांनी पकडले, असे कळले होते की तिने अमृतपालला आसरा दिला होता. एप्रिल, १० ला पंजाब पोलिसांनी २ भावांना अटक केली कारण की त्यांनी होशियारपूर, अमृतपालला सहारा दिला. अशाप्रकारे अनेक लोक अमृतपालला सहारा देत आहेत. त्याचबरोबर अनेक खालीस्तानी लोकांना आसाममधील दिब्रुगड येथे तुरुंगात ठेवले आहे. २९ मार्चला अमृतपालने एक व्हिडिओ प्रकाशित केला. त्यात त्यांनी पोलिसांना धमकी दिली आहे की पंजाबच्या तरुणांना उगाच पकडू नका. मार्च १८ मध्ये पोलिसांनी अमृतपालला पकडण्यामध्ये गोंधळ केला आणि म्हणून तो पळून गेला. पोलिसांच्या या कृत्यामुळे विरोधी पक्ष व अनेक लोकांनी शंका उपस्थित केली आहे की अमृतपालला हे खरेच पकडणार आहेत की पूर्वीसारखे खालीस्तानी दहशतवाद्यांना वाढवणार आहेत. आता अमृतपाल पळाल्यापासून फार प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे खालीस्तानी एक नवीन नेता निर्माण झाला आहे. पंजाब हे ड्रग्स आणि दहशतवादाचे केंद्र अनेक वर्ष आहे आणि आता ते मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचा फायदा पाकिस्तान घेणारच. जर का खालीस्तानी व काश्मिरी दहशतवादी एक झाले तर एक नवीन भस्मासुर भारतामध्ये निर्माण होताना दिसत आहे व कडवट हिंसाचार आपण बघणार आहोत. सैन्याने अनेक बंड थंड केले कारण सैन्याचे एक तत्त्व आहे की दहशतवादाला बंदुकीच्या गोळीने आपण कधीच संपवू शकत नाही. तर दिल और दिमाग को जितके आतंकवाद खत्म कर सकते है | याबद्दल आपल्या नेत्यांना काहीच माहीत नाही. दिल और दिमाग जिंकल्याच सोडाच पण साध सुसंस्कृत धोरण सरकार राबवू शकत नाही. म्हणून पुढच्या काळात या भागातील बंडोबाचा खंडोबा करण्यासाठी एक धोरण बनवावे व ड्रग्स आणि दहशतवादाच्या विरोधात एक जबरदस्त युद्ध खेळाव.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

प्रतिक्रिया व्यक्त करा