सिंधुदुर्गनगरी
शासकीय, स्वयंसेवी बालगृहात दाखाल होणाऱ्या अनाथ मुलांना संस्थेतून बाहेर पडताना जातीचे प्रमाणपत्र नसल्याकारणाने त्यांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती, अनुदान व विषेश लाभ मिळत नाहीत. त्यामुळे अनाथ मुलांना अनाथ असल्याबाबतचे प्रमाण देण्यासाठी विभागीय स्तरावर दिनांक 14 ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत विषेश पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे महिला व बाल कल्याण आयुक्त, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र देण्याबाबत निकष पुढील प्रमाणे आहेत. 1) आई-वडीलांचा शोध घेवून, त्यापैकी कोणीच हयात नसल्याबाबतची खात्री संबंधित यंत्रणेस झाली असणे व त्याबाबतचे संस्थेचे अधिक्षक यांचे प्रमाणपत्र जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रमाणित करावे. 2) जिल्ह्याच्या बाल कल्याण समितीने सदर लाभार्थ्यांचे आई-वडील हयात नसल्याचे व लाभार्थी अनाथ असल्याची चौकशी अंती प्रमाणित करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी बाल कल्याण समितीने जन्म-मृत्यु नोंद रजिस्टर, शाळा सोडल्याचा दाखला, प्रवेश निर्गम रजिस्टरचा दाखला यापैकी एक ग्राह्य धरावा. 3) निकष पूर्ण करणारे मूल, ज्या संस्थेत आहे. त्या संस्थेच्या अधिक्षकांनी अनाथ प्रमाणपत्र मिळण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
पात्रता धारक अनाथ मुलांनी अनाथ प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, प्रशासकीय इमारत, ए ब्लॉक, तळमजला, ओरोसनगरी सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा असे आवाहन, महिला व बाल कल्याण आयुक्त, पुणे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.