You are currently viewing मी पाहिलेली संमेलने…

मी पाहिलेली संमेलने…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*मी पाहिलेली संमेलने…*

साहित्य संमेलन जाहीर झाले रे झाले की माझ्या अंगात
जणू वारे संचारते आणि गुडघे साथ देत नसले तरी मी
कल्पनेच्या भराऱ्या मारू लागते.९१ वे साहित्य संमेलन
जाहीर झाले नि माझ्या मनाला जणू पंख फुटले. अरे वा!
बडोदे? सयाजीरावांचे बडोदे! १६ ते १८ फेब्रूवारी २०१८.
२/३ मैत्रिणींना फोन केले. जायचे का? हो, संमेलनाला
एकटे जाण्यात मजा नाही. २/३ जणी तरी हव्यात. त्या शिवाय
मजा नाही.त्यांचा होकार येताच मुलाने फोरस्टार हॅाटेल बुक
केलं गुगलवर पाहून संमेलन स्थळाच्या अगदी जवळ! हो,
आईच्या गुडघ्यांची काळजी? आमची जाझ नि चांगला
ड्रायव्हर घेतला नि सोळाला सकाळीच लवकर निघालो. ७/८ तासांचा
प्रवास आरामात रस्त्यावर खात पित मजेत बडोद्याला पोहोचलो. बरोबरही खाणेपिणे होतेच! हिवाळ्याचे दिवस होते.
बडोद्याच्या रस्त्यावर ठिकठिकाणी गरमागरम हुरडा तीळ
टाकून भाजून मिळत होता. आमचेच राज्य होते. मनसोक्त हुरडा खाल्ला. व बडोद्याला पोहोचताच हॅाटेल गाठले.

लगेच फ्रेश होऊन संमेलन स्थळी गेलो तर प्रचंड अशी
ग्रंथ दिंडी चालू होती.आमचे तर डोळेच दिपले.कारण
राजाच्या गावाची ती दिंडी राजपोषाखात होती.ढोल ताशे
तुताऱ्या, अबघ्या बडोद्याच्या शाळा शिस्तीत रस्त्यावर
अवतरल्या होत्या. फार सुंदर दिसत होती मुले मुली. आम्ही
तर हरवू नये म्हणून हात पकडूनच फिरत होतो.आणि तो दिमाखदार उद् घाटन सोहळा. आम्ही खेटूनच उभ्या होतो.
लक्ष्मीकांत देशमुख संमेलनाध्यक्ष होते. भव्य पेंडॅाल.
सारे काही भव्य व नेत्रदीपक होते. खूप मोठ्या सुंदर सजवलेल्या पेंडॅाल मध्ये अख्खे बडोदे शहर व महाराष्ट्रातील
शेकडो साहित्यिक हजर होऊन सारा देखणा सोहळा”याची
देही याची डोळा” अनुभवत होते. उद् घाटन, सुत्रे प्रदान करणे
अध्यक्षीय भाषण .. वाह वा फारच जोरदार व ठणकाऊन
भाषण झाले.

राजाच्या गावाला खाणे पिणे अगदी चोख व्यवस्था होती.
कुठे ही अनागोंदी नाही गडबड नाही. जेवण मस्त होते.यथेच्छ
समाचार घेतला नि मग रात्रीचा बडोदे सांस्कृतिक प्रोग्राम!
वाह रे वा.. बडोदेकर खरंच राजे शोभले. अती उत्कृष्ठ
गाण्यांचा भरगच्च व खानदानी कार्यक्रम व काटेकोर नियोजन.
कुठेही गोंधळ नाही.पहाटेचे तीन वाजले तरी लोक उठेनात असा! कान मन तृप्त झाले.सकाळी लवकर तयार होऊन
संमेलन स्थळी नाश्ता घेऊन आम्ही पेंडॅाल मध्ये हजर !
आणि मग सुरू झाले परिसंवाद! चार खोल्यांमध्ये वेगवेगळ्या
विषयांवर वेगवेगळे परिसंवाद! सगळेच वक्ते थोर! देवा रे!
कोणता परिसंवाद अटेंड करावा हा प्रश्न यायचा. उपस्थिती?
पाय ठेवायला जागा नाही!

आणि हो, एक सांगायचे राहिले, बडोद्याच्या राजमाता ह्या
सर्व कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित होत्या. धन्य ते बडोदेकर!
दिवस धामधुमित, त्यात बडोदे पहायला वेळ काढायचा म्हणजे कसरतच होती. शहर तर पहायलाच हवे. मग दुपारी
काही कार्यक्रमांना नाईलाजाने फाटा देऊन बडोदा भ्रमंती केली.राजवाडा…? अबबबबबबबबबब… कानाला स्पीकर
लावून कॅामेंट्री ऐकत पाहिला. बाप रे. ? किती तरी एकरावर
असलेल्या या राजवाड्याने व त्यातील वस्तुंनी आमचे डोळे दिपवले. काय ते वैभव !!!येथिल बगीचा तुम्ही पायी पाहूच
शकत नाही एवढा मोठा आहे. त्या साठी छोटी रेल्वे आहे. त्यात बसून पहायचा, आहे ना गंमत !पुन्हा रात्री बडोद्यातीलच
स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम तोही तितकाच
दर्जेदार…! डोळ्यांचे पारणे फिटले.

असे तीन दिवस कुठे गेले समजलेच नाही. मध्ये मध्ये बडोदे
पहाणे बाजार हिंडणे चालू होतेच.मन कसे तृप्त तृप्त होते.
वाटत होते बडोदे सोडून जाऊच नये. बडोदा कापड बाजार
फिरलो पण कळले की सुरत छान आहे कपड्यांसाठी! मग
परतीच्या प्रवासात खरेदी करू असे ठरले.आणि मंडळी
परतीच्या प्रवासात सुरतचा कपडा व्यवसाय पाहून आम्ही
थक्क झालो.कपड्यांशिवाय तिथे काहीच दिसत नाही.
आम्ही खूप साड्या ड्रेसेस व चादरी खरेदी करून तो ही आनंद
मिळवला.( कानात सांगते, नवऱ्यांना आपल्या बरोबर नेऊ नये)
मग खूप मजा येते.

तर मंडळी, पूर्वी अशीच दर्जेदार संमेलने होत असत. आजच्या
सारखे बकाल व बाजारू स्वरूप त्याला आले नव्हते. वाद संवाद होत असत पण ती पेल्यातील वादळे असत. लगेच
निवत असत. संमेलन भरवणारे किती दमदार आहेत यावर
संमेलनाचे भवितव्य ठरते. परिसंवाद तर माणसाला समृद्ध
करून टाकतात इतके वक्ते दर्जेदार असतात. मी १९८०चे
मुंबईचे दादरला भरलेले मालतीबाई बोडेकरांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या
संमेलना पासून ते कोल्हापूर पुणे नागपूर चिपळूण नाशिक यवतमाळ
बडोदे अशी अनेक संमेलने अटेंड केली पण सर्वत्र उत्तम
अनुभव आला व त्या त्या वक्त्यांनी आम्ही समृद्ध होत गेलो.
नाही म्हणायला १९८० च्या संमेलनात नामदेव ढसाळांवर
श्रोते खुर्च्या घेऊन धावल्याचे व उभे राहिल्याचे आठवते. पण
ते ही तात्पुरते त्यामुळे संमेलनाला कुठे ही गालबोट लागले
नाही.

आमचे नाशिकचे २००५ मधील संमेलन तर “ न भूतो न भविष्यती” असेच झाले. चार कोटीची नुसती ग्रंथविक्री झाली
व तो एक उच्चांक प्रस्थापित झाला.आणि कार्यक्रम व आखणी अत्यंत दर्जेदार होती. केशव मेश्राम संमेलनाचे
अध्यक्ष होते. मी तेव्हा ओझर शाखेत कामाला होते.आणि
आता नुकतेच ६/७ मे ला नाशिकला कुसुमाग्रज प्रतिष्ठान
येथे झालेले “अखिल भारतीय लेखक प्रकाशक संघाचे”
चौथे संमेलनही अत्यंत दिमाखदार व कसदार झाले यात
शंकाच नाही. कवी अशोक नायगावकरांची दीड तास
चाललेली व हास्याचे फटाके फोडणारी मुलाखत..
कोणीच विसरणार नाही व “उज्वल निकम “ यांची नियोजित
पाऊण तासाची पण तीही दीड तास चालणारी मुलाखत
अविस्मरणीय झाली. शिवाय माझ्या अध्यक्षते खाली झालेले
कवी संमेलन व इतर परिसंवादही उत्तम झाले. बक्षिस वितरणाचा कौतुक सोहळाही छान होता.नाश्ता जेवण मस्त.

म्हणजे आजचे बाजारू व पैसे भरा व मोमेंटो घेऊन जा असे
एक ही बकाल संमेलन मी अटेंड केले नाही.संमेलनात मला
शांता शेळके, अनिल अवयट, ना धो महानोर नारायण सुर्वे
मंगेश पाडगांवकर वसंत बापट डॅा.श्रीराम लागूं सारखे दिग्गज
बघायला ऐकायला मिळाले व मी घडत गेले ही केवढी
मोठी जमेची बाजू होती, आहे.मी बडोदा संमेलनाचे व नाशिक
संमेलनाचे काही फोटो रात्री उशिरा टाकणार आहे. बरेच डिलिट झालेत, तुमच्या नशिबाने काही आहेत. मला थोडीच
माहित होते की भविष्यात मला संमेलनावर लेख लिहावा लागणार आहे? अरे, एक सांगायचे राहिलेच..बडोदेकरांनी सयाजीरावांवर १२ खंड प्रकाशित केले ते व इतरही बरीच ग्रंथ खरेदी आम्ही केली..गाडीत भरपूर जागा होती.चिंतेचे कारण नव्हते. तर मंडळी …
काही ही झाले तरी संमेलने असावीतच .. होय ना?
तोटा कमी, फायदा जास्त .. खरंच ना?

बाय बाय ….

आपलीच …
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: ११ मे २०२३
वेळ : दुपारी ४/४८

प्रतिक्रिया व्यक्त करा