विजयानंतरही राजस्थानची भिस्त गुजरात-हैदराबाद सामन्यावर
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
आयपीएल २०२३ च्या ६६ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जच्या पुढील फेरीचे दरवाजे बंद केले आहेत. राजस्थानने हा सामना चार गडी राखून जिंकला आणि आपल्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या. दुसरीकडे पंजाबचा संघ सलग नवव्या हंगामात साखळी फेरीतच बाहेर पडला. २०१४ मध्ये ते शेवटचे प्लेऑफमध्ये पोहोचले होते. तेव्हा त्यांनी उपविजेतेपद पटकावले होते. तर २००९ मध्ये त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती. आयपीएलच्या आजवरच्या १६ हंगामात पंजाबचा संघ केवळ दोनदा साखळी फेरीच्या पुढे जाण्यात यशस्वी झाला. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज होती. ध्रुव जुरेल आणि ट्रेंट बोल्ट यांनी पहिल्या तीन चेंडूत चार धावा केल्या. यानंतर जुरेलने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून सामना संपवला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबने २० षटकांत ५ बाद १८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.४ षटकांत ६ बाद १८९ धावा केल्या. राजस्थानकडून देवदत्त पडिक्कलने सर्वाधिक ५१ धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ५० आणि शिमरोन हेटमायरने ४६ धावा केल्या. रायन परागने ११ चेंडूत २० आणि ध्रुव जुरेलने ४ चेंडूत नाबाद १० धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनला केवळ दोन धावा करता आल्या. त्याचवेळी जोस बटलरचा खराब फॉर्म कायम राहिल्याने त्याला खातेही उघडता आले नाही. पंजाबकडून कागिसो रबाडाने दोन बळी घेतले. सॅम करण, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
पंजाबबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान आणि सॅम करणने शेवटच्या षटकात वेगवान धावा करत संघाला १८० धावांच्या पुढे नेले. शेवटच्या दोन षटकांत दोघांनी मिळून ४६ धावा केल्या. सॅम करनने ३१ चेंडूत नाबाद ४९ धावा केल्या. जितेश शर्माने ४४ आणि शाहरुख खानने २३ चेंडूत नाबाद ४१ धावा केल्या. अथर्व तायडेने १९ आणि शिखर धवनने १८ धावांचे योगदान दिले. लियाम लिव्हिंगस्टोनने नऊ आणि प्रभसिमरन सिंगने दोन धावा केल्या. राजस्थानकडून नवदीप सैनीने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याने अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांना बाद केले. ट्रेंट बोल्ट आणि अॅडम झाम्पाला प्रत्येकी एक यश मिळाले.
या विजयानंतर राजस्थानचे १४ सामन्यात १४ गुण झाले आहेत. त्यांची निव्वळ धावगती +०.२४८ आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्सचेही १४ गुण आहेत. मुंबईची निव्वळ धावगती (-१२८) राजस्थानपेक्षा कमी आहे आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. या विजयानंतर संजू सॅमसनचा संघ पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. जर राजस्थान संघाने हा सामना १८.३ षटकांत जिंकला असता, तर त्याचा निव्वळ धावगती आरसीबी (०.१८०) पेक्षा चांगली असती, परंतु तसे झाले नाही. आता राजस्थान संघ प्रार्थना करेल की, आरसीबीने गुजरात टायटन्सविरुद्धचा शेवटचा साखळी सामना मोठ्या फरकाने गमावावा. याशिवाय सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबईचाही पराभव व्हावा. पंजाबबद्दल बोलायचे झाले तर ते १४ सामन्यांत १२ गुणांसह आठव्या स्थानावर आहेत.
धर्मशाला क्रिकेट स्टेडियमवर पंजाब किंग्ज संघाने पहिल्यांदाच सलग दोन्ही सामने गमावले. यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासोबत पंजाबचा आयपीएल प्रवासही संपुष्टात आला. त्याचवेळी स्टेडियम पूर्ण खचाखच भरले असल्याने प्रेक्षक तिकीट घेऊन उभे होते. प्रवेश न मिळाल्याने त्यांनी एचपीसीएच्या विरोधात घोषणाबाजीही केली. पंजाबचा सलामीवीर शिखर धवनची बॅट एचपीसीए स्टेडियम धर्मशाला येथे सलग दुसऱ्या आयपीएल सामन्यात बोलली नाही. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झालेला धवन दुसऱ्या सामन्यात १७ धावा करून धवन बाद झाला. पॉवर प्लेमध्ये झटपट धावा करण्याचे दडपण पंजाबच्या फलंदाजांवर दिसून आले. धरमशाला येथील फलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर पंजाबला सुरुवातीलाच धक्का बसला. या मैदानावर प्रथमच खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सच्या नवदीप सैनीने दमदार गोलंदाजी करत तीन बळी घेतले. देवदत्त पडिक्कलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.