सावंतवाडी
येथील पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून सागर साळुंखे यांनी आज पदभार स्वीकारला.तर त्या ठिकाणी कार्यरत असलेले मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे यांची दि.१६ मे रोजी सावंतवाडी मुख्याधिकारी म्हणून बदलीचे आदेश निर्गमित करण्यात आले. त्यांना दि.१७ मे ला हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यांनी आज पदभार स्वीकारला. मात्र जयंत जावडेकर यांची तडकाफडकी बदली झाली ते ठिकाण या आदेशात नाही.
नगरपरिषद प्रशासनाने साळुंखे यांनी पदभार स्वीकारला असल्याचे सांगितले. जावडेकर यांची तडकाफडकी बदली कोठे झाली ते आदेश उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेवर प्रशासक असल्यामुळें प्रशासकीय कारभार बाबत जनतेतून चलबिचल झाली असून अनेक प्रलंबित कामे पूर्ण झाली नाहीत. तसेच नगरपालिका अर्थसंकल्पावरून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना लक्ष करण्यात आले होते.माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी तर अर्थसंकल्प वास्तववादी नसल्याने आंदोलन करण्याचा इशारा दिला तर शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्थसंकल्पाबाबत तक्रार केल्यानंतर स्थगिती मिळाल्याचे जाहीर केले होते. तर भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी देखील अर्थसंकल्पाबाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले होते.