जलसंधारण व नळ पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणांनी कालबध्द कार्यक्रम राबवावा
-पालकमंत्री रविंद्र चव्हाण
सिंधुदुर्गनगरी
जलसंधारण, जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना या कामांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये जलसंधारणाअंतर्गत 6 नवीन प्रकल्पांना मान्यता दिली आहे.जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठ्याची 614 कामे प्रगती पथावर आहेत. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल. ही कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणानी कालबध्द कार्यक्रम राबवावा. जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांची गाव निहाय सविस्तर माहिती जिल्हा परिषदेच्या संकेस्थळावर संबंधित यंत्रणांनी उपलब्ध करुन द्यावी. यामुळे जनतेला सुरु असलेल्या कामबाबत योग्य ती माहिती मिळेल. अशा सूचना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जलसंधारण अंतर्गत सुरु असलेली कामे, प्रलंबित कामे, भूसंपादन प्रक्रीया, जलजीवन मिशन अंतर्गत कामे व तिल्लारी प्रकल्पाचा पाणीपुरवठा व कोस्टलला जोडणारा पाणीपुरवठा याबाबत आढावा बैठकी संपन्न झाल्या. यावेळी जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जि.प. मुख्य कार्यकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) अविशकुमार सोनोने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, बांधकाम विभागाचे अधिकारी अजयकुमार सर्वगोड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास गायकवाड, माजी आमदार राजन तेली, आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. चव्हाण पुढे म्हणाले, जलसंधारण प्रकल्पांच्या कामामध्ये जिल्हा प्रशासनाने भूसंपादनाची प्रक्रीया तातडीने राबवावी तसेच भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान उपलब्ध करुन द्यावे. जिल्ह्यात 39 प्रस्ताव प्रलंबित असून ते तातडीने मार्गी लावावे.जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामिण भागात पाणी पुरवठा करण्यासाठी प्राध्यन्य द्यावे. यासाठी 465 योजनांचा कृती आराखडा तयार असून यांची अंदाज पत्रकीय किंमत 430 कोटी आहे. या सर्व योजनांना कार्यरंभ आदेश देण्यात आला आहे. यामध्ये 49 कामे पुर्ण झाले असून 614 कामे प्रगती पथावर आहेत. ती तातडीने पुर्ण करावीत. या पुर्ण होणाऱ्या कामाच्या माध्यमातून सुमारे 50 हजार कुंटुंबाना नळ जोडणी करुन देणे शक्य होणार आहे. असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले, 2023-24 च्या पुरक आराखड्यामध्ये 64 योजनांच्या कृती आराखड्याला मान्यता देण्यात येईल. यासाठी सुमारे 20 कोटी 83 लाख निधी दिला जाईल. त्याचबरोबर तिल्लारी प्रकल्पाचा पाणीपुरवठा व कोस्टलला जोडणारा पाणीपुरवठा योजनेंचे 70 ते 80 टक्के काम पुर्ण झाले असून उर्वरित 20 ते 30 टक्के काम जलद गतीने पुर्ण करावे. उर्वरित कामासाठी लागणारा निधी याबाबतचा प्रस्ताव तयार करुन प्रशासनामार्फत शासनास सादर करण्यात यावा.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा आढवा सादर करतांना म्हणाले सन 2024 पर्यंत ‘हर घर नल से जल’ या प्रमाणे ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणी व्दारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे उद्दिष्ट आहे. याव्दारे जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात 70 दोडामार्ग 53, कणकवली 104, कुडाळ 124, मालवण 126, सावंतवाडी 78, वैभववाडी 51, वेंगुर्ला 59 अशा एकूण 665 योजनाचा कृती आराखडा तयार करुन कार्यरंभ आदेश देण्यात आले आहेत. यासाठी 430 कोटी 82 लाख इतका निधी लागणार आहे.