You are currently viewing मळेवाड गावात दाखला आपल्या दारी

मळेवाड गावात दाखला आपल्या दारी

ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम

 

सावंतवाडी –

ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून शासन आपल्या दारी अभियानांतर्गत दाखला आपल्या दारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा शुभारंभ आजगाव मंडळ अधिकारी व्ही एस कोदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आला.

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत,विविध सेवा योजनाचा लाभ मिळावा यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. याच अभियानाचा भाग म्हणून सावंतवाडी तहसीलदार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे यांच्या वतीने आज ग्रामपंचायत कार्यालयात दाखला आपल्या घरी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मुलांना शैक्षणिक प्रवेश घेत असताना लागणारे महत्त्वाचे दाखले त्याच बरोबर रेशन कार्ड वरील नाव कमी करणे, नवीन नाव नोंद करणे व इतर महत्त्वाचे दाखल्याची सेवा देण्यात आली. या शिबिराचा शुभारंभ आजगाव मंडल अधिकारी व्ही एस कोदे यांच्या शुभहस्ते व सरपंच सौ मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. हे शिबिर उपसरपंच हेमंत मराठे यांच्या संकल्पनेतून व सावंतवाडी तहसीलदार उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी उपसरपंच हेमंत मराठे यांनी या शिबिर आयोजित करण्यामागचा नेमका उद्देश व्यक्त करत असताना महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी या अभियानाला सुरुवात केली असून हे शिबिर याच अभियानाचा एक भाग असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने अतिशय चांगले अभियान सुरू केले असून लाभार्थ्यांनी या अभिनयाचा लाभ घ्यावा असे आवाहन मराठे यांनी केले. तसेच या शिबिरामध्ये आरोग्य व शिक्षणासाठी लागणाऱ्या दाखल्यांच्या फी मध्ये ५०% सूट ग्रामपंचायत कडून देण्यात येणार असल्याचेही मराठे यांनी सांगितले. यावेळी ग्रा पं सदस्य अमोल नाईक, ग्रा प सदस्य अर्जुन मुळीक, आजगाव तलाठी सी नागराज, नेमळे तलाठी ए बी पाटोळे, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा