अजय वीरांची औरंगाबादेत बदली; विभाग आधुनिक करण्यास मोठे योगदान…
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी डॉ विजय वीर यांची औरंगाबाद येथे बदली झाली असून त्यांच्या जागी सुजितकुमार जाधोर यांची शासनाने नियुक्ती केली आहे.
डॉ वीर यांनी ११ जुलै २०१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पदाचा पदभार स्वीकारला होता. चार वर्षे दहा महिने त्यांनी जिल्ह्यात काम केले आहे. जिल्ह्यातील भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग, मिळकत पत्रिकांचे संगणकीकरण, स्वामित्व योजनेतून बारा गावठाण क्षेत्रांचे ड्रोन द्वारे भूमापन करून हद्द निश्चिती करणे तसेच मिळकत पत्रिकांची सनद वाटप करणे, जिल्हा कार्यालयात अद्यावत अभ्यागत कक्ष स्थापन करणे. जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करीत जमीन मोजणीसाठी अत्याधुनिक रोअर मशीन उपलब्ध करणे. तसेच प्लॉटर मशीन उपलब्ध करणे, आदी भरीव काम डॉ वीर यांच्या कार्यकाळात झाले आहे.
भूमी अभिलेख यंत्रणेचा कारभार संगणीकृत करण्यासाठी त्यांनी विशेष भर दिला होता. विशेष म्हणजे त्यांच्या काळात या विभागाचा कारभार जलद होण्यास चालना मिळाली. मोजणी प्रकरणे निपटारा करण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली होती. तसेच अपील प्रकरणे सुद्धा त्यांनी विनाविलंब निकाली काढण्यावर भर दिला होता. आता डॉ वीर यांची औरंगाबाद जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या पदावर बदली झाली आहे. त्यांच्या जाग्यावर हिंगोली येथील जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुजितकुमार जाधोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.