मालवण
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या मोचा चक्रीवादळामुळे दि. १० व ११ मे रोजी पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून याबाबत जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मालवण येथील सहाय्यक मत्स्य आयुक्त कार्यालयाच्या सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांनी केले आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या मोचा चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मत्स्य विभाग व मत्स्य व्यवसाय राज्य आयुक्त यांच्याकडून किनारपट्टी भागात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्राप्त सूचनांनुसार मालवण येथील सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता कारंगुटकर यांनी जिल्ह्यातील सर्व मच्छिमार व मच्छिमारी संस्था यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे.
मोचा चक्रीवादळामुळे दि. १० व १९ रोजी पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे व मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने त्याअनुषंगाने वादळीवारे व पावसाचे हवामान योग्य होईपर्यंत या कालावधीत नौकांनी सावधगिरी बाळगावी. जाळी इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवावी. योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. सदर हवामान संदेशाबाबत संस्थेचा नोटीस बोर्ड, बंदर/मासळी उतरविण्याचे केंद्र येथे लिहीण्यात यावे. परराज्यातील नौकांना बंदरात मदत व निवारा देण्यात यावा. जिवित व वित्त हानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक ती विशेष काळजी व दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना मत्स्य विभागातर्फे तेजस्विता करंगुटकर यांनी दिल्या आहे.