हिंमत असेल तर मला अडवूनच दाखवा
राम कदम यांचे राज्य सरकारला जाहीर आवाहन..
रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरुन आता भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार राम कदम हे सोमवारी अर्णव गोस्वामी यांना भेटण्यासाठी नवी मुंबईच्या तळोजा येथील कारागृहात जाणार आहेत.
त्यावेळी ‘हिंमत असेल तर मला अडवूनच दाखवा’, असे जाहीर आव्हान राम कदम यांनी मुंबई पोलीस आणि राज्य सरकारला दिले आहे. राम कदम यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. आज सकाळी ११ वाजता मी तळोजा कारागृहात जाऊन अर्णव गोस्वामी यांची भेट घेणार असल्याचे राम कदम यांनी म्हटले आहे.
देशातील १३० कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मी अर्णव गोस्वामी यांना भेटायला जाणार असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आज नवी मुंबईत हायव्होल्टेड ड्रामा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.कालच राम कदम हे अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी घाटकोपर ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी चालत गेले होते.
अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचे कदम यांनी म्हटले होते. तत्पूर्वी राम कदम यांनी अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी मंत्रालयाबाहेर उपोषण केले होते.तत्पूर्वी पोलिसांनी रविवारी सकाळी अर्णव गोस्वामी यांना अलिबागहून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते.
अलिबागच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलिसांना चकमा देत एका व्यक्तीने अर्णव गोस्वामी यांच्यापर्यंत मोबाईल पोहोचवल्याची माहिती समोर आली आहे.
या मोबाईलवरुन अर्णव गोस्वामी यांनी एक फोन केल्याचेही समजते.