इचलकरंजी/प्रतिनिधी –
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र श्री २०२३ राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत कलाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा खेळाडू अजिंक्य आण्णासो रेडेकर हा उपविजेता ठरला.
इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मान्यताप्राप्त महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन संलग्न बॉडी बिल्डिंग ऍण्ड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड संघटनेच्या वतीने व महाराष्ट्र बॉडिबिल्डींग असोसिएशन अध्यक्ष किरण सावंत यांच्या सौजन्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पुरुष शरीर सौष्ठव, मेन्स फिजिक, महिला शरीर सौष्ठव व वुमन मॉडेल फिजिक या गटात स्पर्धा घेण्यात आल्या.
अजिंक्य रेडेकर याने विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवला आहे. या स्पर्धांमध्ये विजेता ठरण्यासह उत्तराखंड येथे संपन्न स्पर्धेत ३५० शरीरसौष्ठवपटूमध्ये अजिंक्य रेडेकर हा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरला होता. तर आता पुणे येथे संपन्न राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत तो उपविजेता ठरला आहे. त्याच्या या उज्वल यशाने वस्त्रनगरीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अजिंक्य रेडेकर याला सहकार महर्षि कलाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. तर प्रशिक्षक गुरु मनिष अडविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रशिक्षण सुरु आहे.