नाईट कॉलेजमध्ये मुक्तसंवाद अंक प्रकाशन , एकदिवसीय कार्यशाळा संपन्न
इचलकरंजी : प्रतिनिधी
पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकाराने समाजप्रबोधन करण्याबरोबरच समाजात सकारात्मक विचार निर्माण करणे गरजेचे आहे. समाज व माध्यमे एकत्र आल्यास घटनाकारांना अपेक्षित लोकशाहीची रुजवणूक होणे शक्य आहे. यासाठी पत्रकाराने लोकशाहीच्या रक्षकाची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकारामध्ये जिद्द, चिकाटी असणे अत्यंत महत्वाची असते, असे मत जेष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
येथील देशभक्त बाबासाहेब भाऊसाहेब खंजिरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासकेंद्र, नाईट कॉलेज इचलकरंजीमधील बी.ए. जनसंज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या शिक्षणक्रमाच्या “मुक्तसंवाद” अंक प्रकाशन आणि लोकशाहीतील पत्रकारांची भूमिका व हक्क” या एकदिवसीय कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पत्रकारांना २४ तास मेहनत करावी लागते, बातमी तयार करण्यापासून ती प्रसिद्ध करण्यापर्यंतचा कालावधी खूप महत्वाचा असतो. बातमी ही समाजभान राखणारी, सकारात्मक पत्रकारिता निर्माण करणारी असावी लागते. सध्या उत्तम, जाणकार पत्रकारांची उणीव जाणवते. पत्रकारितेमध्ये उत्तम संधी उपलब्ध आहेत, असे मत अध्यक्षीय भाषणात दि इचलकरंजी इंडस्ट्रीयलचे चेअरमन व माजी नगरसेवक राहुल खंजिरे यांनी व्यक्त केले.
कार्यशाळेसाठी हातकणंगले, शिरोळ, इचलकरंजी परिसरातील सर्व वर्तमानपत्र , टीव्ही चॅनेलचे संपादक, मुख्य बातमीदार यासह सुमारे ४० पत्रकार उपस्थित होते. या सर्वांचा सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख तथा प्राचार्य डॉ. पुरंधर डी. नारे , जेष्ठ पत्रकार दयानंद लिपारे, डॉ. पी.आर. पिळणकर, प्रा. डॉ. देवेंद्र बिरनाळे, राजेंद्र मुठाणे, प्रा. एफ. एन. पटेल, प्रा. एस. एस. पाटील, प्रा. एस. ए. डोईजड, प्रा. अश्विनी लोहार, प्रा. सुनंदा मोटे, प्रा. एस. के. पाटील, प्रा. एम. एम. पाटील, सतीश म्हाकाळे, विद्यार्थी-विद्यार्थिनीनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
प्रास्ताविक केंद्रसंयोजक प्रा. डॉ. आर. व्ही. सपकाळ यांनी केले. स्वागत अंजुम शेख, प्रमुख पाहुण्यांची ओळख नजीर मुल्ला, सूत्रसंचालन नंदकुमार बांगड तर आभार प्रदर्शन अमोल चोथे यांनी केले.