मणिपूर / इंफाळ :
मणिपूर राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मोठा जातीय हिंसाचारात सुरु झाला. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राज्यात कायदा व्यवस्था बिघडल्याने कर्फ्यू लावण्यात आला आहे. दरम्यान, यात थोडीशी शिथिलता आणली गेली आहे. त्यामुळे लोकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करता याव्यात यासाठी मणिपूर सरकाराने रविवारी सकाळी 7:00 ते सकाळी 10:00 पर्यंत कर्फ्यू अंशतः शिथिल केला आहे. दरम्यान, मृतांचा आकडा 54 वर गेला आहे. तसेच दुसरीकडे आज होणारी वैद्यकीय प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान, राज्याच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांनी शनिवारी राज्यातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. चुरचंदपूर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सुधारल्यानंतर आणि राज्य सरकार आणि विविध संघटनांमध्ये झालेल्या चर्चेनंतर कर्फ्यूमध्ये अंशत: शिथिलता घेण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सरकारने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.
मणिपूरमध्ये 3 मे रोजी हिंसाचाराला सुरुवात झाली. या हिंसाचारानंतर राज्यात वातावरण तणावपूर्ण आहे. तेथे सुरक्षा दलांचा कर्फ्यू आणि फ्लॅग मार्च सुरु असून लोकांची ये-जा पूर्णपणे ठप्प झाली होती. वसतिगृहात फक्त एक वेळचे जेवण आणि पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. दुर्गम भागात अजूनही गोळीबार सुरु असून अनेक ठिकाणी लोकांना पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्यात.
हिंसाचारातील मृतांचा आकडा 54 वर
दरम्यान, मणिपूर हिंसाचारातील मृतांचा आकडा 54 वर गेला आहे. लष्कर, सीआरपीएफ, आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांचे जवान राज्याच्या विविध भागात फ्लॅग मार्च काढत आहेत. शनिवारी राज्यातील परिस्थितीमध्ये किंचित सुधारणा झाली असून राजधानी इंफाळमधील अनेक बाजारपेठा पुन्हा सुरु झाल्या आहेत. यासोबतच रस्त्यांवरही वाहनांची ये-जा सुरु असल्याचे दिसून आले. तथापि, मणिपूरच्या डोंगराळ भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाल्याचे वृत्त आहे, त्यानंतर तेथील रस्ते बॅरिकेड्स आणि नाकेबंदी करण्यात आले आहेत. राज्यात आज म्हणजेच 7 मे रोजी होणारी NEET-UG ही वैद्यकीय प्रवेश परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे.
सुमारे 60 विद्यार्थीही अडकल्याची माहिती
दरम्यान, मणिपूरमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या जातीय हिंसाचारात उत्तर प्रदेशचे सुमारे 60 विद्यार्थीही अडकल्याची माहिती आहे. हे सर्व विद्यार्थी राजधानी इंफाळमधील एनआयटीचे विद्यार्थी असून सध्या तेथे शिक्षणासाठी आहेत, असे सांगण्यात येत आहे. तेथे अडकलेले विद्यार्थी गोरखपूर, वाराणसीसह उत्तर प्रदेशातील सर्व भागातील रहिवासी आहेत. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मणिपूरमधून बाहेर काढण्याचे आवाहन केले आहे.