You are currently viewing अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस २० वर्षाची शिक्षा

सिंधुदुर्गनगरी

एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोषी धरुन त्याला 20 वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साधी कैद अशा स्वरुपाची शिक्षा जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधिशांनी आज सुनावली. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांनी दिली.

आरोपीविरुद्ध भा. दं. वि. कलम 376 (1), 376 (2) (N), 376 (3), सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो अॕक्ट) 2012 चे कलम 4, 6, 8, 10, 12 नुसार गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्याचे अन्वेषण तत्कालीन पोलीस उप निरीक्षक गायत्री पाटील यांनी मुदतीत करुन आरोपीविरुद्ध जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. त्यानुसार खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, यांच्या न्यायालयात होवून अपराध्यास न्यायालयाने दोषी धरुन त्याला आज शिक्षा सुनावली.

या खटल्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता म्हणून अॕड संदिप राणे यांनी अभियोग पक्षाचे कामकाज पाहिले, तर आरोपीने नैतिकेच्या विरुद्ध जावून किळसवाणे कृत्य केलेले असल्याने व तसे वैद्यकीय, शास्त्रीय सबळ पुरावे प्राप्त झाल्याने आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याकरिता अति. सरकारी अभियोक्ता अॕड गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तीवाद केला. सदर दोषसिद्धी होण्यासाठी पैरवी अधिकारी म्हणून पो.उ.नि. जयराम पाटील, पो.हे.कॉ. मल्लिकार्जुन ऐहोळी, पो.हे.कॉ. सिद्धी वेंगुर्लेकर यांनी उत्तम कामगिरी केली.

जिल्ह्यामध्ये न्यायालयाच्या पटलावर नियमीतपणे चालणाऱ्या खटल्यांचे पर्यवेक्षण व पृथक्करण करण्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी Trial Monitoring Cell ची निर्मिती केलेली आहे. त्या माध्यमातून पोलीस अधीक्षक हे न्यायालयात चाललेल्या फौजदारी खटल्यांच्या कामकाजाचा दैनंदिन आढावा घेवून दोषसिद्ध होण्याच्या दृष्टीने पोलीस अधिकारी यांना नियमीत सूचना देत आहेत. तसेच अपर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनातून गुन्हयामध्ये आरोपींना दोषसिद्धी होण्याचे प्रमाण वाढविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे.

या गुन्ह्यात उत्कृष्ट अपराधसिद्धी झाल्याने पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी गुन्ह्याचे तपास अधिकारी, सर्व सरकारी अभियोक्ता, पैरवी अधिकारी, तपासास सहकार्य करणारे सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक व अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा