रवींद्र चव्हाण यांच्याकडे मागणी
मालवण
शहरास गेली दोन वर्षे पोलीस पाटील नसल्याने शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तरी ही रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी माजी नगरसेवक परशुराम उर्फ आप्पा लुडबे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात डिसेंबर २०२१ पर्यंत दोन पोलीस पाटील कार्यरत होते. मात्र हे पोलीस पाटील वयोमानानुसार निवृत्त झाले तेव्हापासून आजपर्यंत शहराचा अर्ध्या भागाचा कार्यभार हा तीन किलोमीटरवर असलेल्या कुंभारमाठ गावातील पोलीस पाटील यांच्याकडे तर दुसऱ्या भागाचा कार्यभार दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवबाग येथील पोलीस पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. सध्या या दोन्ही पोलीस पाटील यांच्याकडे त्यांच्या परिसरातील गावांचा पदभार असल्याने ते मालवण शहरास वेळ देऊ शकत नाहीत. परिणामी शहरातील विद्यार्थी, मे महिन्यात आलेले चाकरमानी तसेच स्थानिक नागरिक यांना विनाकारण अतोनात मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा संपल्याने शालेय विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची आवश्यकता भासते. त्याचबरोबर मे महिन्यात मुंबईतील चाकरमानी गावी येऊन महसूल विभागाशी निगडित विविध कामे करत असतात. त्यामुळे स्थानिक पोलीस पाटील उपलब्ध नसतील तर त्यांची गैरसोय होणार आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करता शहरासाठी कायमस्वरूपी दोन पोलीस पाटलांची तत्काळ नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी श्री. लुडबे यांनी केली आहे.