शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर ज्ञानमंदिर आणि या ज्ञानमंदिराची गरज अगदी ब्रिटिशांच्या काळातही ओळखली होती ती म्हणजे मालवण तालुक्यातील वेरली गावातील जाणकार ग्रामस्थांनी…! भारतावरील ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीत प्रत्येक भारतीय पोळून निघत असताना वेरली गावाच्या ग्रामस्थांनी आपल्या गावाबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील मुले ज्ञान घेऊन सुशिक्षित व्हावी, शिकावित असे विचार उराशी बाळगत ब्रिटिश राजवटीतच वेरली गावच्या श्रीदेवी सातेरी मंदिराच्या प्रांगणातच ज्ञानमंदिर सुरू केले. ब्रिटिश राजवटीत ज्या मोजक्यात शाळा ग्रामस्थांच्या सहयोगातून उभ्या राहिल्या त्यातीलच एक म्हणजे मालवण तालुक्यातील वेरली गावातील हीच ती आजची जिल्हा परिषदेची पूर्ण प्राथमिक शाळा वेरली. विद्येच्या या ज्ञानमंदिरात वेरली गावा बरोबरच आजूबाजूच्या गावातील अनेक मुले ज्ञान ग्रहण करत होती.
मालवण शहरापासून अवघ्या २० किलोमीटरवर वेरली हे एक छोटीशी टुमदार गाव उभे आहे. याच वेरली गावात १८ नोव्हेंबर १८५६ रोजी ग्रामस्थांच्या सहकार्याने श्रीदेवी सातेरीच्या प्रांगणात प्राथमिक शाळा उभी राहिली. विद्येची देवता सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने देवी सातेरीच्या प्रांगणात विद्येचे ज्ञानमंदिर खुले झाले आणि याच ज्ञान मंदिरात शिकून सवरुन अनेक मुले सुशिक्षित बनली, त्यांचे आयुष्य सोन्यासारखे सुंदर घडले. १८५६ मध्ये सुरू झालेल्या वेरली गावच्या या शाळेला आज तब्बल १६६ वर्षे पूर्ण होत आहेत. ब्रिटिश राजवट गेली आणि भारतात लोकशाही स्थापन झाली एक एक बदल होत गेले आणि जीर्ण झालेली ही शाळा मोडकळीस आली. पुढे श्रीदेवी सातेरीच्या प्रांगणापासून अर्धा फरलांगभर अंतरावर गावचे ग्रामस्थ स्वर्गीय सिताराम कृष्णाजी परब यांच्या जमिनीवर ग्रामस्थांनी नवीन शाळेची इमारत उभारली, ती आजही मोठ्या दिमाखात उभी आहे.
*दयाकर दान भक्ती का, हमे परमात्मा देना*
*दया करना, हमारी आत्मा मे, शुद्धता देना।*
*हमारे ध्यान मे आओ, प्रभू आँखों मे बस जाओ*
*अंधेरे दिल मे आकर के परमज्योजी जगा देना।।*
परमात्माला आवाहन करणारी अशी प्रार्थना आजही शाळांमधून मुलांच्या मुखातून वदत असते आणि ऐकणाऱ्यांचे तन मन तृप्त होत असते.
वेरली गावातील लोक सामाजिक सांस्कृतिक राजकीय शैक्षणिक कला आणि क्रीडा क्षेत्रात अग्रेसर आहेत. एवढेच नव्हे तर भारत मातेच्या रक्षणासाठी सीमेवर लढणारे सैनिकही यावेळी गावातून गेलेले आहेत. आजही वेरली गाव सुशिक्षित प्रगत लोकांचा गाव म्हणून ओळखला जातो. ज्या गावाने ब्रिटिश काळातही शिक्षणाने माणूस समृद्ध होतो हा विचार घेऊन काम करणारे ग्रामस्थ पहिले तो गाव आज कसा काय मागे राहील? १८ नोव्हेंबर १८५६ साली ब्रिटिश राजवट असताना देखील पहिली ते चौथीपर्यंतची शाळा देवी सातेरीच्या प्रांगणात सुरू करण्याचे धाडस दाखविले त्या ग्रामस्थांना नक्कीच आपण वंदन केले पाहिजे.
सातेरीच्या प्रांगणात सुरू झालेली ही शाळा म्हणजे मातीच्या चार भिंती असलेला भला मोठा हॉल आणि त्यावर नळ्यांचे छप्पर. परंतु पुढे हे छप्पर मोडकळीस आल्यामुळे वेरली गावातील ग्रामस्थ आप्पा गावकर, सिताराम उर्फ आणा कृष्णाजी परब, दाजी लाड आणि धाकू भिवा परब या मंडळीनी नवीन इमारत बांधण्याचे ठरविले आणि सिताराम उर्फ आना कृष्णाजी परब यांनी बक्षीस पत्राने दिलेल्या जमिनीवर शाळेची चार खोल्यांची दिमागदार इमारत उभी राहिली. या इमारतीसाठी गावातील लोकांनी कोणी आपली झाडे दिली, कोणी कौले दिली तर कोणी इमारतीसाठी लागणारे इतर साहित्य, पैसे दिले तर काहींनी श्रम केले.
शाळेचे छप्पर मोडकळीस आल्याने तत्कालीन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सहदेव धामापूरकर आणि त्यांचे शिक्षक सहकाऱ्यांनी शाळा नव्याने बांधलेल्या इमारतीमध्ये सुरू केली. परंतु शासनाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या या कृतीला आक्षेप घेत त्यांना नोटिसा बजावल्या. शासनाने केलेल्या कारवाईच्या विरोधात ग्रामस्थ एकवटले आणि शासनाला माघार घेण्यास भाग पाडले. त्यामुळे शासनाने नवीन इमारतीत शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. नव्याने बांधलेल्या या इमारतीत पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग बसायचे आणि वेरली गावाबरोबरच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ अगदी पहाटे हातात कंदील घेऊन आपल्या मुलांना वेरली गावातील शाळेत सोडण्यात येत असत.
आज त्याच इमारतीला लागून शिक्षक खोली इमारत, संगणक कक्षाची इमारत, पोषण आहार साठीची इमारत अशा इतर इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. वेरली गावातील या शाळेत शाळा पूर्वतयारी अभियान, नवोदितांचे स्वागत, मोफत गणवेश वितरण, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, कुंडी वाटप, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रम, परिपाठ, पाककला स्पर्धा, राष्ट्रीय पोषण आहार, योगासने प्रात्यक्षिके, महाराष्ट्राची लोकधारा, भरारी विद्यार्थी हस्तलिखित, आमची परसबाग, बांधावरची शाळा, विद्यार्थ्यांचा दशावतार, लोकसहभागातून शाळेसाठी झोपाळा, घसरगुंडी, विद्यार्थ्यांची लेझीम पथक, लोकसहभागातून बाळ गोपाळ पतंग, साने गुरुजी कथामाला, संगणक साक्षरता वर्ग, रांगोळी स्पर्धा, सावित्रीबाई फुले जयंती, मराठी भाषा गौरव दिन, विविध क्रीडा स्पर्धा, महिला दिन, रांगोळी मार्गदर्शन वर्ग, कार्यानुभव प्रात्यक्षिक वर्ग, विज्ञान विविध प्रयोग, शैक्षणिक व सामाजिक सह शालेय उपक्रम प्रशालेच्या मुख्याध्यापिका शुभदा रेडकर, पदवीधर शिक्षक राजेंद्र धारपवार, उपशिक्षक उदय कदम, सौ पूर्वा केळुस्कर इत्यादी शिक्षक वर्ग राबवीत आहेत.
वेरली गावच्या शाळेचा शतकोत्तर हीरक महोत्सव साजरा करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले. त्यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभदा रेडकर आणि त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी तसेच शतकोत्तर हीरक महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय परब, उपाध्यक्ष आबा परब, सेक्रेटरी सुरेश मापारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौतम तांबे, उपाध्यक्ष नारायण पोयरेकर, सरपंच धनंजय परब, उपसरपंच दिनेश परब तसेच इतर ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शतकोत्तर हीरक महोत्सव समिती, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि महिला वर्ग यांनी हिरारीने भाग घेतला. वेरली गावातील या सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आपल्या गावातील शेकडो वर्षांपूर्वीची शाळा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना जपण्याचे अत्यंत मोलाचे कार्य वेरली ग्रामस्थ करत आहेत. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन…! भविष्यात या शाळेतून असेच एकापेक्षा एक सरस विद्यार्थी ज्ञान घेऊन बाहेर पडावेत आणि शाळेबरोबरच गावाचे नाव उंचवावे हीच अपेक्षा.