मालवण
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या सांगतानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून संपूर्ण राज्यात साजरे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर नेहमीच नावीन्यपूर्ण कलाकृती साकारणारे कट्टा येथील वराडकर हायस्कुलचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे जवळपास दोन सेंटिमीटर उंचीचे शिल्प साकारत शाहू महाराजांना मानवंदना दिली आहे.
समीर चांदरकर हे एक उत्कृष्ट कलाकार असून आजपर्यंत त्यांनी चित्रकला, रांगोळी यासह विविध वस्तूंचा वापर करीत प्रयोगशील कलाकृती साकारल्या आहेत. शाहू महाराजांचे महाराष्ट्रातील सर्वात लहान त्रिमितीय शिल्प साकारण्याचा आपण प्रयत्न केला असल्याचा दावा श्री. चांदरकर यांनी केला आहे. त्यांच्या या कलाकृतीचे सर्वांकडून कौतुक होत आहे.