शरद पवारांचा राजीनामा राष्ट्रवादीच्या सदस्य समितीनं फेटाळला
राष्ट्रवादीच्या सदस्या समितीनं शरद पवार यांनी घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय फेटाळला आहे.
‘लोक माझे सांगाती’ याच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती. शरद पवारांच्या घोषणेनंतर सभागृहात एकच गदारोळ झाला. साहेब निर्णय मागे घ्या, कार्यकर्त्यांनी मागणी करत ठिय्या दिला होता. तेव्हापासूनच शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्या, असा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. शरद पवारांनी त्यावेळी चेंडू राष्ट्रवादीच्या सदस्य समितीच्या कोर्टात टोलावला होता. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. सध्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच एका कार्यकर्त्यानं प्रदेश कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही कार्यकर्त्यांना वारंवार शांत राहण्याचं आवाहन करत आहेत. दरम्यान, शरद पवारांचं मुंबईतील निवासस्थान ‘सिल्वर ओक’वर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.
सदस्य समितीकडून ‘प्लॅन ए’, ‘प्लॅन बी’?
आज शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर समिती निर्णय देणार आहे. समिती काय निर्णय देणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अशातच एबीपी माझाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा ॲक्शन प्लॅन तयार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समिती आज दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडणार आहे. प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जातील. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समस्य समिती देणार आहे. पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार आहे. दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे.