वेंगुर्ला
स्त्री समाज सुधारक व ज्येष्ठ समाजसेविका व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्या, साप्ताहिक सत्यप्रकाशच्या माजी संपादिका मीराताई जाधव यांनी अनेकांना आपल्या विचाराने मार्गदर्शन केले होते. त्यामुळे अनेक संस्थांना प्रेरणा मिळाल्या.तसेच पत्रकारिता क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान असल्याने सर्वांना त्या प्रेरणादायी आहेत.त्यांचे कार्य असेच पुढे सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणार,अशी प्रतिक्रिया जिल्हा बँक संचालिका सौ. प्रज्ञा परब यांनी यावेळी व्यक्त केली.
स्त्री समाज सुधारक व जेष्ठ समाजसेविका, राष्ट्रीय आदर्श शिक्षिका मीराताई जाधव यांचा श्रद्धांजली कार्यक्रम वेंगुर्ले येथील महिला काथ्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ.प्रज्ञा परब बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर कृषिभूषण एम.के.गावडे, वेंगुर्ले पं. स.सभापती अनुश्री कांबळी, न.प.उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, उद्योजक पुष्कराज कोले, प्रविणा खानोलकर, दिपा जाधव, हेतल जाधव, सुजाता देसाई, गीता परब, श्रुती रेडकर, ॲड.राणे, सविताश्रम चे संदीप परब, सौ. परब, कामत आदी उपस्थित होते.
यावेळी सिंधुदुर्ग भूषण म्हणून ज्यांचे वर्णन केले गेले, अशा मिराताई जाधव यांच्या जाण्यानं जिल्ह्याचे रत्न हरपले आहे. मिराताई ह्या आधुनिक सावित्रीबाई होत्या.स्वतःच्या उमेदीच्या काळात राजकारणा सहित समाजकारणात आपला ठसा उमवणाऱ्या मिराताई हे एक वेगळे व्यक्तिमत्व होते, अशा शब्दात कृषिभूषण एम. के. गावडे यांनी मिराताईंना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती पदक मिळालेल्या मिराताई जाधव यांनी जी शिकवण जिल्ह्याला दिली ती प्रत्येकाने जोपासणे गरजेचे आहे. आजच्या नवोदित मुलींनी मिराताईंच्या पावलावर पाऊल ठेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी पुढे यावे, हीच त्यांना आदरांजली असेल, अशा शब्दात पुष्कराज कोले यांनी श्रद्धांजली वाहिली. जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महिलांसाठी मिराताईंचा आदर्श घेणे गरजेचे आहे.त्यांच्या जाण्याने साहित्य, सामाजिक, पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. पुढील काळात त्यांचा आदर्श जोपासण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया सभापती अनुश्री कांबळी यांनी व्यक्त केली.