बांदा ८/११/२०२० राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, पुणे व LFE यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन विकास मंचवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राज्यस्तरावर सादरीकरण झाले. शैक्षणिक गुणवत्तेत नेहमी आघाडीवर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोवीड १९च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असतानाही ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने शिक्षण चालू ठेवून मुलांचा शिक्षणात खंड पडू दिला नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविलेल्या या उपक्रमांची दखल घेऊन राज्यभरातील सर्व शिक्षकांना माहिती व्हावी यासाठी पुन्हा एकदा भेटूया … आॉनलाईन विकास मंचावर संवाद साधूया! या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रकाश जाधव यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या बाबतीत अद्ययावत ठेवण्यासाठी माहीती संप्रेषण, तंत्रज्ञान, गणित, इंग्रजी व संशोधन विषयाची प्रशिक्षणे सुरळीतपणे चालू ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर भाष्य केले. प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी लाॅकडाऊन कालावधीत शाळा बंद असल्या तरी प्रशासकीय यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित केली व पाठ्यक्रमाची पूर्तता करणेसाठी कोणते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले याबाबत मार्गदर्शन केले. कुडाळ तालुक्यातील माणगाव व वाडोस केंद्राचे केंद्रप्रमुख दिनकर तळवणेकर यांनी सहकारी शिक्षकांच्या साहाय्याने १०० टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कसे केले याचे सादरीकरण केले. वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी नं. १शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीमती स्नेहलता राणे यांनी लाॅकडाऊन कालावधीत पालकांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित चालू रहावे व मूलभूत संकल्पना सुस्पष्ट व्हाव्यात म्हणून पालकांची मदत कशाप्रकारे घेतली याचे सादरीकरण केले. सावंतवाडी तालुक्यातील उपक्रमशील शाळा बांदा नं १चे उपशिक्षक जे. डी. पाटील यांनी लाॅकडाऊन कालावधीत शाळा बंद असल्या तरीही विद्यार्थ्यांसाठी घरातूनच विविध सहशालेय उपक्रमांचे स्पर्धात्मक स्वरुपात आयोजन करून अध्ययन निष्पत्ती व राष्ट्रीय मूल्यांचा विकास कसा साध्य केला व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक उपक्रमात मिळवलेले सुयश व शैक्षणिक उठाव याबाबतीत सादरीकरण केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक ज्येष्ठ अधिव्याख्यता श्रीमती किरण धांडे मॅडम (SCERT,M) यांनी केले तर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गच्या अधिव्याख्याता श्रीमती सुषमा कोंडूसकर यांनी या चर्चासत्रात वेचक प्रश्न विचारून निवेदन केले. यावेळी राज्य शैक्षणिक व संशोधन संस्थेचे संचालक श्री दिनकर पाटील हे उपस्थित होते. या सत्राबद्दलचा अभिप्राय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील उपसंचालक डाॅ.विलास पाटील यांनी दिला तर चर्चासत्राचे समारोप परिषदेचे अधिव्याख्याता श्रीअरुण जाधव, यांनी केला. हे मुलाखत सत्र यशस्वी पार पाडण्यासाठी उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, अधिव्याख्याता लवू आचरेकर, महेश गावडे, तसेच LFE चे शाश्वत, शिवाजी लाळगे, प्राथमिक शिक्षण विभाग व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण संस्था यांचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
ऑनलाईन विकास मंचवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे राज्यस्तरावर सादरीकरण…
- Post published:नोव्हेंबर 8, 2020
- Post category:बातम्या
- Post comments:0 Comments