*अखेर सावंतवाडी नळपाणी योजनेला राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेमधून 56 कोटी 17 लाख रुपये मंजूर*
*पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मिळवून दिली मंजुरी*
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेचा पाणीपुरवठा प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत राज्यस्तरीय मान्यता समितीकडे मान्यते करिता पाठविण्यात आला होता. या प्रकल्पाला मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ठाणे विभाग यांनी तांत्रिक मंजुरी दिली होती. त्या अनुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दिनांक 9 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्ये सदर प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
महाराष्ट्र स्वराज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियांना अंतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्प संदर्भातील अटी शर्ती व मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या 9 डिसेंबर 2022 रोजीच्या पत्रांवये दिलेल्या तांत्रिक मंजुरीच्या अधीन राहून शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत सावंतवाडी नगरपालिका पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 56 कोटी 17 लाख रुपये मंजूर करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सदरची योजना अवघ्या तीन महिन्यात मार्गी लावली; त्यामुळे माननीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांनी सदरची योजना मा. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तीन महिन्यात मार्गी लावल्यामुळे प्रत्यक्ष भेटून त्यांचे आभार मानणार असल्याचे सांगून अशाच पालकमंत्र्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याला गरज असल्याचे म्हटले आहे.
सावंतवाडी शहराची पाणीपुरवठा योजना ही संस्थान काळापासूनची योजना असून त्यावेळी सावंतवाडी शहराची मर्यादित लोकसंख्या पाहता योग्यच होती; परंतु अलीकडच्या काळात सावंतवाडी शहरात नव्याने उभ्या राहिलेल्या इमारती, बंगले आणि वाढलेली लोकसंख्या पाहता सावंतवाडी शहराला होत असलेला पाणीपुरवठा हा अपुरा असून उन्हाळ्यात नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत होते. अनेक वेळा जुनी असलेली पाणीपुरवठा पाईपलाईन फुटल्यानंतर कित्येकदा पाणीपुरवठा बंद होतो; त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होतात. सावंतवाडी शहरात असलेली पाणीपुरवठा पाईपलाईन बदलणे ही काळाची गरज बनली होती; परंतु शासनाकडून गेली अनेक वर्षे यासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना रखडली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री श्री.रवींद्र चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेत रखडलेली सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना तीन महिन्यात मार्गी लावली आणि सावंतवाडीवासियांना दिलासा दिला आहे.