You are currently viewing बांदाकेंद्र शाळेत राज्य स्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा अभूतपूर्व उत्साहात संपन्न

बांदाकेंद्र शाळेत राज्य स्तरीय शाळापूर्व तयारी मेळावा अभूतपूर्व उत्साहात संपन्न

बांदा

भारताने जगाचे नेतृत्व केले पाहिजे. त्यासाठी प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे काम आम्ही हाती घेतले असून त्यासाठी मुलांना हसत खेळत शिक्षण घेता यावे यासाठी शाळेतील “पहिले पाऊल” हा उपक्रम प्रभावी ठरेल. महाराष्ट्राच्या तिजोरिवर सगळ्यात जास्त हक्क लहान मुलांचा असून त्यासाठी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध असणार आहे. यावर्षी पासून प्रत्येक मुलाला गणवेश व शैक्षणिक साहित्य मोफत मिळणार आहे. बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेची रोल मॉडेलसाठी निवड करण्यात आली असून आधुनिक शिक्षण पद्धती अमलात आणण्यासाठी वर्षभरात १ कोटी ८५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. राजकारणापेक्षा जनतेच्या हिताकडे लक्ष देणाऱ असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले.
बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळेत राज्य शासनाच्या वतीने शाळा पूर्व तयारी पहिले पाऊल व माझी ई शाळा , व्हर्च्युअल क्लासरूम,पायझम फाऊंडेशन यांचेकडून प्राप्त झालेली संगणक लॅब यांचे आदि उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री केसरकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक केदार पगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, बांदा उपसरपंच जावेद खतीब, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे, प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे, तुकाराम लालगे, तहसीलदार अरुण उंडे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुढे म्हणाले,गतवर्षीपासून हा उपक्रम चालू करण्यात आला या उपक्रमात ९ लाखापेक्षा माता व १२ लाखापेक्षा मुलांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये ३० टक्के विकास दिसून आला त्यामुळे यंदा पासून हा उपक्रम अधिक प्रभावी झाला पाहिजे त्यासाठी हा उपक्रम आहे. यात ज्युनिअर सिनिअर केजी तील मुलांना कसे शिकवावे हे ट्रेनिंग दिले जाणार आहे. उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी पाया भक्कम असला पाहिजे. पीएमसी अंतर्गत बांदा प्राथमिक शाळेकरिता १ कोटी ८५ लाख रुपये निधी देणार असून लवकरच बांदा शहरातील मुले बसने शाळेत येतील त्यासाठी एक बस लवकरच शाळेला देण्यात येईल. राज्यात ही शाळा मॉडेल म्हणून कशी उभी करता येईल याकडे माझे विशेष लक्ष आहे.
प्रधान सचिव रणजित सिह देओल म्हणाले, तिसरी इयत्तेत जाताच मुलांना पूर्णपणे लिहिता वाचता आलं पाहिजे त्यासाठी आमचे विशेष प्रयत्न आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी शिक्षण क्षेत्रात अग्रणी असून येथील विद्यार्थी हुशार आहेत. येत्या कला इ लर्निंग बाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.व्हर्च्युअल क्लासरूमचा फायदा मुलाना कसा घेता येईल याकडे लक्ष असणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात बैलगाडीतून शोभायात्रेने करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांवर मान्यवर व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी केली.शाळेच्या परिसरात शिक्षणाची गुढीची उभारण्यात आली होती.. यावेळी शिक्षणमंत्री केसरकर यांच्या हस्ते व्हर्च्युअल क्लासरूम, ई लर्निंग, संगणक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. बाळा आंबेरकर, मृण्मयी पंडित, महेश कदम, राजेश ठाकूर, आर्या देऊलकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, सरोज नाईक, जे डी पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सेतू पुस्तकाचे, घडी पत्रिकेचे , राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे ३५ उपक्रमशील शाळांच्या गुणी शिक्षक गुणवंत शाळा या पुस्तकाचे तसेच बांदा शाळेच्या विविध उपक्रमांचे उपशिक्षक जे.डी‌पाटील यांनी संग्रहित केलेल्या सोनेरी क्षण या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ई लर्निंग च्या उद्घाटन प्रसंगी मंत्री केसरकर यांनी मुलांसोबत गप्पा मारल्या त्यांना शाळेत येताना जाताना काही अडचणी आहेत का विचारले तर काहींना प्रश्न सुद्धा विचारले तर व्हर्च्युअल क्लासच्या माध्यमातून राज्यातील अकोला व पालघर येथील मुलांशी त्यांनी संवाद साधला.
या कार्यक्रमासाठी राज्यस्तरावरील तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा परिसरात मुलांच्या भौतिक व बौद्धीक विकासासाठी ७ स्टॉल उभारण्यात आले होते. मंत्री केसरकर यांनी याची माहिती घेत सर्वाना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा