सावंतवाडी :
पोलीस सेवेत असताना उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या दोन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व दहा पोलीस हवालदारांसह बारा जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. त्यापैकी काही जणांचा सावंतवाडीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांच्या हस्ते शुक्रवारी सत्कार करण्यात आला. पोलीस सेवेत असताना प्रामाणिक आणि खडतर पणे काम करून आपला तसेच पोलीस खात्याचा गौरव या सर्वांनी वाढवला आहे. असे गौरवउद्गगार विशेष पोलीस महानिरीक्षक पवार यांनी यावेळी काढले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल व विभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी साळुंखे उपस्थित होत्या.
त्यावेळी क्राईम ब्रँच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सतीश कविटकर, क्राईम ब्रँच हवालदार रूपाली खानोलकर, जिल्हा पोलीस शाखेच्या तपस्या चव्हाण, सीआयडी हवालदार गोविंद तेली, मोटार परिवहन शाखा हवालदार भालचंद्र दाभोलकर, महेश घाडीगावकर यांचा सत्कार करण्यात आला. या पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या कामातून पोलीस विभागात ठसा उमटवला आहे.
त्यांचे पोलीस सेवेतील कार्य प्रशंसनिय असे आहे. अशी कामगिरी पोलीस विभागातील अन्य कर्मचाऱ्यांनी बजावली पाहिजे असे पवार म्हणाले. यावेळी कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी उपविभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना पवार यांनी मार्गदर्शन केले. कर्नाटक मध्ये विधानसभा निवडणुका आहेत आपला जिल्हा सीमेवर आहे त्यामुळे आपण दक्ष राहिले पाहिजे. दारू वाहतुकीवर कडक कारवाई करतानाच अन्य हालचालीवरही लक्ष ठेवले पाहिजे असे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. सर्व बारा कर्मचाऱ्यांचा 1 मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनी ओरोस येथे सत्कार करण्यात येणार आहे.