राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा : एस.टी. अधिकाऱ्यांना निवेदन सादर
कणकवली
मुंबई गोवा महामार्गावरील तरंदळे फाटा येथे सर्व एस.टी. बसेस पूर्वीप्रमाणेच थांबविण्यात याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी आज एस.टी. अधिकाऱ्यांकडे केली. तसेच तरंदळे फाट्यावर एस.टी. बस न थांबल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
महामार्ग चौपदरीकरणात तरंदळे फाटा येथे बॉक्सवेल उभारण्यात आला. तर येथील महामार्ग दुतर्फा सर्व्हीस रोड तयार करण्यात आला आहे. चौपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर काही दिवस तरंदळे फाटा सर्व्हीस रोड येथे एस.टी. बस थांबविल्या जात होत्या. मात्र गेल्या सहा महिन्यापासून सर्व एस.टी. बसेस बॉक्सवेलवरून नेल्या जात आहेत.
कलमठ तरंदळे फाटा येथून अनेक विद्यार्थी, नाेकरदार, तसेच सर्वसामान्य प्रवासी ओरोस तसेच अन्य ठिकाणी जाण्यासाठी थांबलेले असतात. मात्र येथे एस.टी. बस येत नसल्याने तेथून अर्धा किलोमिटर अंतरावर जाऊन येथील प्रवाशांना थांबावे लागते. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी तरंदळे फाटा येथे पूर्वीप्रमाणेच एस.टी. बसेस थांबवाव्यात अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला.
एस.टी. अधिकाऱ्यांना बस थांबा बाबतचे निवेदन देताना राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, जिल्हा चिटणीस रुपेश जाधव, कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर, युवक कणकवली तालुका अध्यक्ष नयन गावडे, प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर, युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर, युवक जिल्हा सरचिटणीस सागर वारंग, विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर, कृषी सेल तालुकाध्यक्ष चंद्रकांत नाईक, कलमठ विभागीय अध्यक्ष शंकर चिंदरकर, श्री कदम इत्यादी उपस्थित होते.