You are currently viewing कळसुलीतील बोटिंग प्रकल्प रोजगारासाठी उपयुक्त : आ. नितेश राणे

कळसुलीतील बोटिंग प्रकल्प रोजगारासाठी उपयुक्त : आ. नितेश राणे

कणकवली

पर्यटनातून रोजगार आणि रोजगारातून समृद्धी ही संकल्पना केंद्रीय उद्योग मंत्री आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात आणली. १९९० पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाला चालना मिळत गेली.आज कळसुली सारख्या सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या गावातील धरणात पर्यटकांना आकर्षित करणारा बोटिंग प्रकल्प सुरू करणे ही पर्यटन विकासासाठी फार मोठी गोष्ट आहे. यातूनच स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. कळसुली गावची ओळख नव्याने निर्माण होणार आहे. देश विदेशातील पर्यटक जल पर्यटनासाठी आपल्या गावापर्यंत येतील आणि गावात आर्थिक समृद्धी निर्माण होईल. त्यासाठी हा बोटिंग प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरेल. असे गौरवोद्गार आमदार नितेश राणे यांनी काढले.यावेळी प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत आणि त्यांच्या संचालकांनी असा प्रकल्प गावात आणल्याबद्दल कौतुकही केले.

कणकवली तालुक्यातील कळसुली – देदोंनवाडी धरणात प्रेमदया प्रतिष्ठान व सिंधुदुर्ग फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ‘बोटिंग आणि फिशिंग’ जलपर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कळसुली सरपंच सचिन पारधिये‌,प्रेमदया प्रतिष्ठान अध्यक्ष हनुमंत सावंत प्रेमदया प्रतिष्ठानचे ट्रस्टी अरुण सावंत, संदीप पालकर, माजी सरपंच अतुल दळवी, माजी जि . प. सदस्या सायली सावंत, उपविभागीय अभियंता पाटबंधारे महेश हिरेगौडर, मत्स्य व्यवसाय अधिकारी मालवण प्रदीप सुर्वे, मत्स्य अधिकारी चिन्मय जोशी, प्रधानमंत्री आवास मत्स्य संपदा योजना जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक बहर महाकाळ, कळसुली हायस्कूल चेअरमन के. आर. दळवी, कळसुली हायस्कूल मुख्याध्यापक व्हि. व्हि. वगरे , कळसुली तंटामुक्ती तंटामुक्त समिती, अध्यक्ष दिलीप सावंत, आदी उपस्थित होते.

आमदार नितेश राणे म्हणाले,कळसुली येथील ‘बोटिंग आणि फिशिंग’ प्रकल्प जलपर्यटनात क्रांती घडविणार यात शंका नाही.अनेक लोक नोकरी व्यवस्थेसाठी शहरात राहता मात्र त्या ठिकाणी ज्या सेवा सुविधा आणि चांगला व्यवसाय चालतो तो गावात आणून हनुमंत सावंत आणि अरुण सावंत,संदीप पालकर,यांनी समाजाला आदर्श घालून दिला आहे.

गावाप्रती असलेले प्रेम यातून दिसते ते सर्वांनीच आत्मसात करावे. असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.
असे गाव विकासाचे आणि गावची प्रतिष्ठा वाढणारे प्रकल्प चालू राहिले पाहिजेत आणि ते चालू ठेवण्यासाठी लोकांचा सहभाग, समर्थन असलेले पाहिजे.तरच आपल्या गावचा नावलौकिक वाढेल. त्या साठी प्रत्येकाने हा बोटिंग प्रकल्प कायम स्वरुपी चालला पाहिजे म्हणून हातभार लावा. आपल्या गृपवरून माहिती लोकांपर्यंत पोचवा. असे केल्यास जगभरातून लोक कळसुली गावात येतील. टीका टिप्पणी करत बदनामी करण्यापेक्षा आपल्या गावात चांगले काम होत आहे तर त्यामागे उभे राहा असे आवाहन केले.

कळसुली गावाचे नाव क्रशरमुळे बदनाम झालेले आहे.या निमित्ताने कळसुली गावाला वेगळी ओळख निर्माण करून द्या. त्यासाठी या प्रकल्पात प्रत्येकाने आपला सहभाग व सहकार्य द्यावे असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले.आमदार म्हणून मी २०० टक्के मदत मी करणार,लागेल ती ताकद देणार. पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि समृद्धी आणता येईल यासाठी माझे प्रयत्न रहाणार.

यावेळी प्रेमदया प्रतिष्ठान अध्यक्ष हनुमंत सावंत यांनी बोटिंग प्रकल्प उभा करण्याचा हेतू आणि त्या मागची कारणे सांगून गावाला नवी ओळख देता येईल असा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले.तर आभार संचालक अरुण सावंत यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा