You are currently viewing संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य केले :- तहसिलदार आर.जे.पवार

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य केले :- तहसिलदार आर.जे.पवार

कणकवली

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्‍न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले.असे प्रतिपादन कणकवली तहसिलदार आर.जे.पवार यांनी केले.

ते शिरवल येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह कार्यक्रमात बोलत होते.यावेळी ह.भ.प.काशीराम फोकमारे महाराज आणि तहसीलदार आर.जे.पवार यांच्या हस्ते गुरुवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरीनाम सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर ह.भ.प.काशीराम फोकमारे महाराज,शिरवल सरपंच गौरी वंजारे उपसरपंच प्रविण तांबे, रविकांत सावंत, पोलिस पाटील विजय शिरवलकर, ह.भ.प.विश्वनाथ महाराज गवंडळकर, रमेश सावंत, रविकांत सावंत, भिकाजी सावंत, सुनिल कुडतरकर,तलाठी अर्जुन घुनावत , बैजनाथ शेलार,सदा राणे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना तहसीलदार आर.जे
पवार म्हणाले की,संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि संत ज्ञानेश्वरांनी अनुयायांना धर्म ग्रंथांवर विसंबून राहण्यास मनाई केली आणि एका निराकार ईश्वरा वरील विश्वासाबद्दल शिकवले.

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी अध्यात्माचे विचार दिलेत आणि जनमानसात चांगले संस्कार रुजविले आणि समाजाला एक वेगळी दिशा दिली. ते विचार पुढे नेण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे चांगले काम ज्ञानेश्वरी वाचनातून ह.भ.प.काशिराम फोकमारे महाराज करीत आहेत.

ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी शिरवल ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदाय यांच्या सहकार्याने श्री विठ्ठल रखुमाई मंदिर उभारणी केली.शिरवल गावात संस्कृती संवर्धनाचे काम ते करत आहेत.आध्यात्मिक विचार देत आहेत.

सुसंस्कृत आणि आध्यात्मिक पिढी घडविण्याचे चांगले कार्य संप्रदायाच्या माध्यमातून करीत आहेत.आज सुशिक्षित आणि सुसंस्कृत निर्व्यसनी पिढी घडविण्यासाठी त्यांनी केलेले काम सर्वच समाजासाठी प्रेरणादायी आहे.

अनेक मंडळी भक्ती मार्गाकडे वळलीआहेत.याचे श्रेय निश्चितच ह.भ.प.गवंडळकर महाराज यांचे आहे.असे गौरवोद्गार तहसीलदार आर.जे.पवार यांनी काढले.

शिरवल उपसरपंच प्रविण तांबे बोलताना म्हणाले की, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत सावतामाळी या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे.रुढी परंपरेतून या देशांमध्ये असणारा सर्व प्रकारचा भेदभाव वारकरी संप्रदायाने नाकारुन समानतेचा विचार संत ज्ञानेश्वरांनी मांडला.व तो विचार सर्व संतांनी पुढे नेला.

आज आपल्या राज्य घटनेत देखील समानतेची तत्वे समाविष्ट केलेली आहेत.हाच विचार तरुणपिढीला मार्गदर्शक आणि आदर्शवादी आहे.असेही प्रविण तांबे यावेळी म्हणाले.यावेळी मोठ्या संख्येने वारकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा