अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना निवेदन सादर
अन्यथा १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा
कुडाळ :
तालुक्यात अनधिकृत रित्या दिल्या गेलेल्या महा – ई – सेवा केंद्राची चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्षमी यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. अन्यथा १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, गेले काही दिवस कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाकडून कुडाळ तालुक्यातील महा – ई – सेवा केंद्राच्या संदर्भात माहितीच्या अधिकारात माहिती/दस्तऐवज/अभिलेख मागवत असून यासंदर्भात पुरेशी माहिती कार्यालयात उपलब्ध नाहीत. यावरून असे लक्षात येते की, महा – ई – सेवा केंद्रे मंजूर करताना शासन निर्णयामध्ये नमूद जे दस्तऐवज बंधनकारक आहेत असे पुरेसे दस्तऐवज उपलब्ध नसतानाही कुडाळ तालुक्यात केंद्रे मंजूर केली आहेत. त्यामुळे बरीच केंद्रे ही अनधिकृतरीत्या मंजूर केली गेली आहेत. जर एका कुडाळ तालुक्यात केंद्रे मंजूर करण्यामागे एवढा अपहार असू शकतो तर संपूर्ण सिंधुदुर्गात जिल्ह्यात केंद्रे मंजूर करण्यामागे खूप मोठा अपहार असू शकतो. त्यामुळे कुडाळ तालुक्यात अनधिकृत रित्या दिल्या गेलेल्या महा – ई – सेवा केंद्राची चौकशी करावी असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे. असे न झाल्यास १ मे रोजी महाराष्ट्र दिनी उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे.