बांदा
इयत्ता पहिलीतील शाळा प्रवेश हा मुलांच्या जीवनातील संस्मरणीय बनावा तसेच मुलांना शाळेप्रति गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी राज्य शासनाचा ‘पहिले पाऊल’ हा राज्यस्तरीय मेळावा शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व प्रथम एज्युकेशन संस्था यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा नं.१केंद्र शाळेत येथे गुरुवार दि.२७ रोजी सकाळी ८ वाजता राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी माझी ई शाळा या उपक्रमाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद बांदा या केंद्र शाळेची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १८५३साली झाली असून १७०वर्षे झालेल्या व जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा म्हणून ख्याती असलेल्या शाळेला राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे.
या मेळाव्यात पहिल्या इयत्तेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पारंपरिक व जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, शिक्षण आयुक्त, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक, राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर,प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे, डाएटच्या प्राचार्या अनुपमा तावशीकर, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांच्यासह राज्यातील शिक्षण खात्यातील वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर यांनी केले आहे.