सावंतवाडी
‘ईद – उल – फितर’ म्हणजेच ‘ रमजान ईद’ हा कार्यक्रम सर्वधर्म समभाव व रमजान ईदचे महत्त्व सर्वांना कळावे या उद्देशाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये साजरा केला गेला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील सहा. शिक्षिका सौ. जरिन शेख यांनी रमजान ईद या सणाविषयी अप्रतिम माहिती सांगितली. त्यात रमजाद ईद हा सण का साजरा केला जातो व त्यामागील मुख्य कारण कोणते, तसेच या सणाचे महत्त्व माहितीत सादर केले गेले. त्याचप्रमाणे या सणानिमित्त जो उपवास केला जातो त्यामागेही आपले शारीरिक स्वास्थ कसे निरोगी राहू शकते याचे वैज्ञानिक कारण सांगितले गेले. त्यानंतर ईयत्ता चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी या सणानिमित्त नृत्य सादर केले. तसेच आपल्या भावी पिढीमध्ये सर्वधर्म समभाव ही शिकवण रुजवावी याकरिता रमजान ईद सणावर आधारित ईयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले. या नाट्याचे बोल सहा.शिक्षिका सौ. नफिसा शेख यांनी सादर करून कशा प्रकारे बंधुभावाने प्रत्येक जातीधर्माचे लोक एकत्र येतात हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकमेकांना ईद मुबारक देऊन कार्यक्रमाची सांगता केली. सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड करण्यासाठी शीरखुर्मा हा पदार्थ देण्यात आला. अशाप्रकारे रमजान ईद हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला.