*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम लेख*
*अक्षय सौख्यानंद*
अक्षय तृतीया…प्रथम तीर्थंकर श्री १००८ आदिनाथ भगवंतांच्या वर्षभराच्या उपवासाचे इक्षुरसाने पारणे होण्याचा हा मंगल दिवस. अभिषेक, पुजा आणि प्रांतानुसार विविध प्रकारच्या चालीरीतींनी आपण हा दिवस साजरा करतो. हे झालं फक्त ह्या एकाच दिवसाचं धार्मिक महत्त्व.
पण आज जरा वेगळ्या दृष्टिकोनातून संपूर्ण जीवनात अक्षय ह्या शब्द कोणत्या अर्थाने वापरता येईल याचा विचार करून पाहु या…
अक्षय म्हणजे कधीही क्षय न होणारं…शाश्वत…
आणि आपल्याला शाश्वत काय हवं असतं तर फक्त सौख्य, आनंद…
पुराणानुसार जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका होऊन मोक्षप्राप्ती म्हणजेच शाश्वत सुख…
पण ते तर ह्या पंचम कालात अशक्य, अप्राप्य आहे. मग त्याखालोखाल निदान स्वर्गसुख…पण मेल्याशिवाय स्वर्ग तर दिसत नाही, आणि तो कितीही सुंदर असला तरीही त्यासाठी मृत्यू स्विकारायला कोणीही तयार होणार नाही. मग राहिली आपण वास्तव्य करत असलेली ही पृथ्वी…पर्यायाने आपलं जग, आपला देश, आपला समाज, आपला परिवार, आपलं कुटुंब…आणि या साऱ्यांसाठी आपण इथेच आपल्या वागण्याने स्वर्ग निर्माण करू शकतो.
अर्थात प्रत्येकाच्या स्वर्ग सुखाच्या कल्पना वेगळ्या असू शकतात. कोणाला सर्व भौतिक सुखाचा उपभोग घेण्यात सौख्य मिळतं तर कोणाला त्यागामध्ये समाधान लाभतं.
कोणी इष्टानिष्टतेचा विचार न करता आत्ताचा क्षण जगून घेण्यावर विश्वास ठेवत असतं तर कोणी भविष्यातल्या सुखसोयींसाठी वर्तमानकाळात जगण्याचंच विसरतं. कोणी स्वतःच्या फायद्यासाठी सर्व नितीनियम झुगारून देतं तर कोणी स्वतःचं कितीही नुकसान झालं तरी आपल्या तत्त्वाला घट्ट चिकटून बसतं. कोणाला परंपरागत अध्यात्म अतिप्रिय तर कोणी कर्मकांडांचा बडीवार न माजवता भक्ती रसात डुंबणारं…कोणी अतिभव्य मंदिरं उभारण्यात समाधान मानणार तर कोणी मानवसेवा हीच ईश्वरपुजा मानणारं …एकंदरीत व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हेच खरं…
आपल्या राज्यघटनेने आचार-विचार स्वातंत्र्य प्रत्येकालाच बहाल केले आहे. पण आपल्या आचरणाने आपल्याला आनंद मिळत असला तरी त्यामुळे कोणी दुखवू नये एवढं पथ्य मात्र पाळलं पाहिजे असं वाटतं. कारण हा आनंद तात्कालिक असतो. निरपेक्ष सेवाभावाने, गरजवंत सत्पात्राला निरहंकारी वृत्तीने यथाशक्ती विद्यादान, आहारदान, अभयदान, औषधदान यांसारख्या छोट्या मोठ्या गोष्टी केल्याने मिळणारा सात्विक आनंद हा मात्र अक्षय असतो. आणि ह्या आनंदाचा संसर्ग जर इतरांना झाला तर तो अनेक पटीने वाढत जातो.
शिवाय आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याच पृथ्वीवर आपल्या पुढील पिढ्यांचं भविष्यातील वास्तव्य सुरक्षित ठेवण्यासाठी पर्यावरणाची अक्षय जपणूक केली तरच ते शक्य होईल. पण आपल्या पूर्वजांनी निसर्गानुकूल सण-उत्सवांची जी परंपरा हेतूपुरस्सर निर्माण केली त्या उद्देशांचे विस्मरण होऊन आजकालचे सण-उत्सव ज्या पद्धतीने उद्देश विरहित साजरे केले जातात ते पाहून मात्र हे कितपत शक्य होईल याची काळजी वाटते.
आजकाल आनंदाची व्याख्याच बदलत चालली आहे. कुठलाही विधिनिषेध न बाळगता केलेल्या आचरणाने मिळणाऱ्या आनंदातुन कधीच काहीही चांगलं निष्पन्न होऊ शकत नाही. तो तर विनाशाकडे नेणारा क्षणिक आनंद होय.
पण हे कळलं तरी वळणं मुष्किल होतंय.
मी, माझं कुटुंब, माझा परिवार, माझा प्रांत, माझं राज्य,माझा देश, माझं जग असा मी पासून ते जगातील सर्व प्राणीमात्रांच्या सौख्याची सर्वांनीच कामना केली आणि ती अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले तर ह्या पृथ्वीवर नक्कीच अक्षय सौख्यानंद नांदेल.
भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
9763204334