राणेच्या पराभवाला कारणीभूत असलेल्या गद्दारानी आता फक्त आपल्या राजकीय अस्तित्वाचीच काळजी करावी
— भाजपा कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे यांचा पलटवार
ज्यांची राजकीय ओळख हीच नारायण राणेसाहेब नावाच्या सुर्यामुळे आहे त्याच सूर्यावर थुंकण्याचे दु:साहस करणाऱ्या संजय पडते, सतीश सावंत यांच्यासारख्याना नियती कधीच माफ करणार नाही. राणे ही व्यक्ती नव्हे, तर विकासाचा विचार आहे, त्यामुळे तुमच्या द्वेषाच्या थुंक्या तुमच्याच तोंडावर पडणार हेच तुमचं भवितव्य आहे.
राणेसाहेबांचा पराभव झाला तेव्हा त्यांच्या प्रचाराची धुरा याच संजय पडते आणि सतीश सावंत यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. काळाच्या ओघात सूर्याजी पिसाळ उघडे पडले आहेत. वास्तविक हे जर सच्चे असते तर या पराभवाची जबाबदारी घेऊन त्यांनी राजकारणातुन तोंड काळे करून घरात बसायला हवे होते. पण हाव सुटलेल्या पिसाळांना थार कुठला होतोय? आज ज्या निर्लज्जपणे पत्रकार परिषदा घेत हे पिसाळ राणेंवर टीका करत फिरताहेत, ते पाहता यांना दिलेले हे काम पाहून अक्षरशः यांची किंव येते. राणेसाहेबांसोबत ज्या सन्मानाने वावरत होता तो आज तुम्हाला मिळतोय का हे स्वतःलाच विचारा आणि मगच तोंड वर करून फिरा. राणेंना हद्दपार करण्याच्या गोष्टी करणाऱ्या सतीश सावंतना तर यापूर्वीच कणकवलीतुन एकदा आणि त्यांच्या आंब्रड मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकांनी हद्दपार करून टाकलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतून त्यांची हद्दपारीही अशीच निश्चित आहे. संजय पडते यांना तर तिकडे पार देवगडचे जिल्हाध्यक्ष पद देऊन पक्षाने इकडे त्यांच्या होमटाऊनमध्ये डोक्यावर वैभव नाईकांना आणून बसवले आहे. हाच तुमच्यावर असलेला विश्वास! आधी याचा विचार करा आणि मगच राणेविरोधाच्या तळ्या उचला. वैभव नाईक यांनी २०२४ च्या गमजा मारण्याची काही गरजच नाही, हिंमत असेल तर आताच राजीनामा देऊन मैदानात उतरुन दाखवावे. कुडाळ मालवणमधून नाही त्यांचा बाडबिस्तारा गुंडाळून पार्सल कणकवलीत पाठवलं, तर राजकारण सोडेन. हिंमतीच्या बाता करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी राजीनामा द्यावाच, या आव्हान भाजपाचे कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे यांनी दिले आहे.