कुडाळ
शहरातील मंदिरानजीकच्या सार्वजनिक महापुरुष स्मशानभूमीकडे अलिकडेच उभारण्यात आलेल्या हायमास्टवरील सहा लाईट चोरट्याने चोरुन नेल्याचे निदर्शनासआले आहे.या सहा लाईटची किंमत २८ हजार रु. आहे. याबाबतची फिर्याद इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर रुपेश रवींद्र मराठे (रा. मांडकुली – फौजदारवाडी ) यांनी मंगळवारी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. मराठे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काम करतात. त्यांनी श्री भवानी इलेक्ट्रिक यांच्याकडून पोटमक्तेदार म्हणून कुडाळ नगरपंचायती मार्फत न. पं. ची स्मशानभूमी येथे हायमास्ट बसविण्याच्या कामाचे टेंडर सुमारे वर्षापूर्वी भरले होते. हे काम कामगारांमार्फत करून घेत होते.
महापुरुष मंदिरानजीकच्या या स्मशानभूमी येथे एका खांबावर आठ लाईटचे हायमास्ट बसविण्याचे काम ७ एप्रिल रोजी पूर्ण केले. हे सामान एनआर डिस्ट्रीब्युटर्स (गुरुनाथ कुडाळ- केळबाईवाडी) यांच्याकडून खरेदी केले होते. सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माजी नगरसेवक सुनील बांदेकर यांनी मराठे यांच्या मोबाईलवर संपर्क करून महापुरुष मंदिराजवळील स्मशानभूमी येथील हायमास्टचे लाईट कशाला काढलात?, असे विचारले तेव्हा आपण लाईट काढले नाहीत,असे त्यांनी सांगून खात्री करण्यासाठी ते लगेचच तेथे गेले.त्यावेळी त्याठिकाणी हायमास्टवर लावलेल्या आठ लाईटपैकी सहा लाईट चोरुन नेल्याचे समजले.